
मुंबई- राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागातर्फे देण्यात येणारा 2014 वर्षासाठीचा विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार कथाकार, प्राध्यापक द. मा. मिरासदार यांना तर श्री. पु. भागवत पुरस्कार केशव भिकाजी ढवळे प्रकाशन यांना जाहीर करण्यात आल्याची घोषणा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मराठी भाषा विभागाचे मंत्री विनोद तावडे यांनी केली. पाच लाख रुपये, मानचिन्ह व मानपत्र असे विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्काराचे स्वरुप आहे. तीन लाख रुपये, मानचिन्ह व मानपत्र असे श्री. पु. भागवत पुरस्काराचे स्वरुप आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने या दोन्ही पुरस्कारार्थींची निवड केली आहे. आज मुख्यमंत्र्यांच्या दालनात 2014 साठीच्या पुरस्कारार्थींची निवड करण्याबाबत बैठक झाली. त्यावेळी मराठी भाषा विभागाचे मंत्री विनोद तावडे, मराठी भाषा विभागाचे सचिव श्रीकांत देशपांडे आदी उपस्थित होते.
मराठी भाषा गौरवदिनी म्हणजेच येत्या 27 फेब्रुवारी रोजी रवींद्र नाट्यमंदिर, प्रभादेवी येथे आयोजित समारंभात हे पुरस्कार प्रदान करण्यात येतील. याप्रसंगी 2014 साठीचे राज्य वाड्मय पुरस्कार तसेच मराठी भाषा विभागाच्या अधिनस्त सर्व कार्यालयांनी प्रकाशित केलेल्या ई-पुस्तकांचे प्रकाशन व ग्रंथप्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.
साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या नामवंत साहित्यिकास 2010 या वर्षापासून विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात येत असून 2014 या वर्षासाठी ज्येष्ठ साहित्यिक प्रा. द. मा. मिरासदार यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. मराठी साहित्य क्षेत्रातील कादंबरी, विनोदी कथा, वगनाटय, चित्रपट संवाद, विविध विषयांवर लेख इत्यादी सर्व साहित्य प्रकार प्रा. मिरासदार यांनी लीलया हाताळले आहे. 5 राज्य पुरस्कार,
गदिमा पुरस्कार, अत्रे पुरस्काराने त्यांना यापूर्वी गौरविण्यात आले आहे. विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्काराने यापूर्वी ज्येष्ठ साहित्यिक विजया राजाध्यक्ष, श्री. के. ज. पुरोहित, ना. धों. महानोर, वसंत आबाजी डहाके यांना गौरविण्यात आले आहे





