भास्कर चंदनशिव संमेलनाध्यक्ष तर संजय राऊत उद्घाटनाला येणार
अलीबाग,दि.०६ःःकल्पनाविश्वात रमणार्या आभासी शेतीसाहित्याचा शेतीमधल्या प्रत्यक्ष वास्तवाशी नाळ जोडण्यासाठी, सांप्रत शेती व्यवसायाला भेडसावणार्या दाहक समस्यांची मराठी साहित्यविश्वाला जाणीव करून देण्यासाठी, नवसाहित्यिकांना सशक्त व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासोबतच त्यांच्या शेतीअर्थशास्त्र व नवतंत्रज्ञानाच्या जाणिवा समृद्ध करण्यासाठी, मराठी साहित्य-सारस्वतांची कृषिजगतासोबत सांगड घालून त्यांना कर्तव्यपूर्तीसाठी प्रेरित करण्यासाठी आणि लेखणीच्या माध्यमातून शेतीची दुर्दशा थांबवून शेतकर्याच्या आयुष्यात सुखाचे व सन्मानाचे दिवस खेचून आणण्याइतपत शक्तिशाली सृजनशील साहित्यिकांची नवीन पिढी निर्माण करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न म्हणून दि. ८ व ९ फेब्रुवारी २०२० रोजी क्षात्रैक्य समाज सभागृह, अलिबाग जि. रायगड येथे दोन दिवशीय ६ वे अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले असल्याची माहिती अ.भा.मराठी शेतकरी साहित्य चळवळीचे संस्थापक अध्यक्ष गंगाधर मुटे यांनी दिली आहे.
संमेलनाचे अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ शेतकरी साहित्यिक भास्कर चंदनशिव यांची निवड करण्यात आली असून ज्येष्ठ पत्रकार संजय राऊत संमेलनाचे उद्घाटन करणार आहेत. ८ फेब्रुवारीला उद्घाटन सत्रात राजीव खांडेकर, संपादक, एबीपी माझा, सुनील तटकरे खासदार, रायगड, सरोजताई काशीकर, माजी आमदार, ऍड सतीश बोरुळकर प्रमुख अतिथी म्हणून तर स्वागताध्यक्ष मा. ऍड प्रदीप पाटील, कार्याध्यक्ष मा. गंगाधर मुटे प्रामुख्याने उपस्थित असणार आहेत.
वरिष्ठ पत्रकार मा. आदिनाथ चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या पुरस्कार वितरण सत्राला कु.अदिती तटकरे, राज्यमंत्री, महाराष्ट्र शासन, आमदार महेंद्र दळवी, नगराध्यक्ष प्रशांत नाईक, कृषी अर्थतज्ज्ञ संजय पानसे, कैलास तवार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
समारोपीय सत्र शेतकरी नेते ऍड वामनराव चटप यांच्या अध्यक्षतेखाली, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट, वरिष्ट पत्रकार राजेश राजोरे,गीता खांडेभराड, बाबुभाई जैन, मा. नीलकंठराव घवघवे, श्री दिलीप भोयर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होईल.
मागील काही वर्षापासून शेतकरी आत्महत्यांनी विक्राळरूप धारण केले आहे, “रोजचेच मढे, त्याला कोण रडे” अशा निर्विकारपणे शेतीव्यवसायाकडे बघण्याची शासकीय यंत्रणेची मानसिकता तयार झाली आहे. राज्यातील गेल्या काही वर्षापासून सततच्या नापिकीने शेतीव्यवसाय डबघाईस आला असतानाच बिगरशेती उत्पादनाचे बाजारभाव आकाशाला भिडत असून शेतीमालाचे भाव एकतर स्थिर आहेत किंवा नीचांक गाठत आहे. परंतू प्रसारमाध्यमे वगळता अन्य कोणत्याही आघाडीवर याविषयीचा फ़ारसा उहापोह होतांना दिसत नाही. राजकीय आणि शासकीय आघाड्यावर उपाययोजना शोधण्याच्या संदर्भात तर सारा शुकशुकाट जाणवत आहे.
समाजाचा आरसा समजल्या जाणाऱ्या साहित्यक्षेत्रात सुद्धा यापेक्षा वेगळी स्थिती नाही. शेतकऱ्याची मुले शिक्षण घेऊन अन्य व्यवसायात गेली, पोटापाण्याचा प्रश्न सुटल्याने लिहिती होऊन अभिव्यक्त व्हायला लागली पण त्यांनाही शेतीच्या वास्तवाकडे अभ्यासपूर्ण आपुलकीने पाहावेसे वाटत नाही, हे शेतीव्यावासायाचे फार मोठे शल्य आहे. गेल्या १५-२० वर्षांमध्ये देशात लक्षावधी शेतकर्यांनी आत्महत्या केल्या आहेत; पण त्याचे प्रतिबिंब साहित्यात प्रभावीपणे का उमटत नाही? याचा शोध घेणे गरजेचे झाले आहे. शेतकरी आत्महत्यांवर सर्वकष प्रकाश टाकणारे, खोलवर अभ्यासपूर्ण मांडणी करून शेतकरी आत्महत्यांच्या कारणांचा शोध घेणारे, शेतीतील गरिबीचे, ग्रामीण भारतातील दुर्दशेचे खरेखुरे कारण सांगणारे आणि तशी अभ्यासपूर्ण मांडणी करून योग्य मूल्यमापन करणारे आणि त्यावर आवश्यक उपाययोजनांची चाचपणी करून जाणिवा समृद्ध करणारे पुस्तक मराठी साहित्यविश्वात आजही उपलब्ध नसणे ही बाब मराठी साहित्यक्षेत्राचे खुजेपण दर्शविणारी आहे.
साहित्यक्षेत्रातील शेतीप्रधान साहित्याची उणीव भरून काढण्यासाठी अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळ कार्यरत असून या प्रयत्नाचाच एक भाग म्हणून २०१५ मध्ये पहिले अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन वर्धा येथे, २०१६ मध्ये दुसरे अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन नागपूर येथे, २०१७ मध्ये तिसरे अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन गडचिरोली येथे, २०१८ मध्ये चवथे अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन मुंबई येथे तर २०१९ मध्ये ५ वे अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन, पैठण येथे आयोजित करून पिढ्यानपिढ्याच्या अबोलतेला बोलते व लिहिते करण्याच्या यशस्वी प्रयत्न करण्यात आला आहे.
या मराठी शेतकरी साहित्य संमेलनाचे स्वरूप आपापल्या कौशल्यगुणांचं, प्रतिभेचं प्रदर्शन मांडून वाहवा मिळवणार्या हौश्या-गौश्या-नवश्यांचा जमाव यापुरतेच केवळ मर्यादित न राहता साहित्यिकांना कल्पनाविस्ताराठी बौद्धिक मेजवानी देणारे प्रशिक्षण शिबीर ठरावे आणि सशक्त लेखणीच्या माध्यमातून इंडियाच्या बरोबरीने भारतालाही समृद्ध व संपन्न करण्यासाठी हातात लेखणी घेऊन लढणाऱ्या लढवैया सृजनशील साहित्यिकांची नवीन पिढी निर्माण करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्याचा उद्देश या संमेलन आयोजनामागे आहे.
दोन दिवस चालणाऱ्या या संमेलनात “हिरव्यागार शेतीला कार्बन क्रेडीटचा लाभ का नाही?” “कांदे आणि अकलेचे कांदे” “खुली बाजारपेठ आणि वायदा बाजार” “खांद्यास चला खांदा भिडवूनी” अशा विविध विषयावरील परिसंवाद राहणार असून या परिसंवादात ज्येष्ठ साहित्यिक, ज्येष्ठ शेतकरी नेते, शेती अर्थशास्त्राचे गाढे अभ्यासक, अर्थतज्ज्ञ इत्यादी अनुभवी वक्ते भाग घेणार असल्याने हे या संमेलनाचे वैशिष्ट्यपूर्ण वेगळेपण असणार आहे.
संमेलनात शेतकरी गझल मुशायरा, शेतकरी कवी संमेलन,शेतकरी कथाकथन व “ज्येष्ठ शेतकरी साहित्यिक मा. शेषराव मोहिते यांची प्रकट मुलाखत” असे स्वतंत्र सत्र ठेवण्यात आले असून या संमेलनात महाराष्ट्रासोबतच देश-विदेशातील १००० पेक्षा जास्त मराठी भाषिक प्रतिनिधी, नामवंत साहित्यिक व ज्येष्ठ विचारवंत सहभागी होतील, असा विश्वास गंगाधर मुटे यांनी व्यक्त केला आहे.




