
भंडारा, दि.10 :- राज्यातील रेशीम शेतीचे महत्व व त्यातून मिळणाऱ्या हमखास व शाश्वत उत्पन्नाची शेतकऱ्यांना माहिती व्हावी. याकरीता सन 2020 मध्ये तुती लागवड व टसर रेशीम लाभार्थ्यांची नाव नोंदणी व जनजागृती करण्यासाठी 7 ते 21 जानेवारी 2020 या कालावधीत राज्यात महारेशीम अभियान 2020 राबविण्यास शासनाने मान्यता दिली आहे.त्यानुषंगाने रेशीम संचालनालयामार्फत संपूर्ण राज्यात सदर कालावधीत महारेशीम अभियान राबविण्यात येत आहे. भंडारा जिल्हयातील सन 2020-2021 मध्ये तुती व टसर रेशीम उद्योगाकरीता नवीन लाभार्थ्यांची नाव नोंदणी करण्यासाठी विविध गावात सभा घेण्यात येणार आहे. त्याकरीता जिल्हा रेशीम कार्यालय, भंडारा यांचेकडून तुती व टसर रेशीम उद्योगाची माहिती देणारा रेशीम रथ तयार करण्यात आला आहे. या रथास उपजिल्हाधिकारी अरुण येरचे यांनी हिरवी झेंडी दाखवून महारेशीम-2020 अभियानाचे उदघाटन केले.
याप्रसंगी जिल्हाधिकारी कार्यालयाचे अधिक्षक साहेबराव राठोड, रेशीम विकास अधिकारी अनिलकुमार ढोले, वैज्ञानिक ए.पी. बागडे, डॉ. प्रविण गेडाम, पी.डी. कळमकर, व्ही. डब्ल्यु. बांते, एस.एस. लोणारे, पी.ए. गुरुमुखी तसेच कंत्राटी तांत्रिक रेशीम अधिकारी कठाने व बोदेले उपस्थित होते.महारोशीम-2020 अभियान अंतर्गत जिल्हयातील किमान 25-30 गावात सभा घेवून टसर व तुती रेशीम उद्योगाची माहिती देवून नोंदणी करण्यात येईल. तुती लागवड करु इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांनी तसेच ज्या गावाच्या परिसरात ऐन व अर्जुन वृक्षाचे जंगल आहे. त्या गावातील गावकऱ्यांनी टसर रेशीम उद्योग करण्याकरीता जिल्हा रेशीम कार्यालय, भंडारा येथे संपर्क साधावा, असे आवाहन रेशीम विकास अधिकारी अनिलकुमार ढोले यांनी के ले आहे.