मुबंई,दि.25ःनागरिकत्व संशोधन कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी कायद्याविरुद्ध वंचित बहुजन आघाडीने शु्क्रवारी महाराष्ट्र बंद पुकारला. या बंदला ठिक-ठिकाणी संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. यामध्ये केंद्र सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणांचा सुद्धा निषेध केला जात आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या या आंदोलनादरम्यान चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला. यामध्ये दिवसभरात विविध परिसरातून 3 हजार पेक्षा अधिक आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले आहे. व्हीबीएचे राज्य प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, 100 पेक्षा अधिक संघटनांनी महाराष्ट्र बंदला समर्थन दिले आहे. पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे, पुण्यात या आंदोलनादरम्यान हिंसक वळणही लागले. यामध्ये दत्तवाडी आणि कोथरूड परिसरात वाहनांवर दगडफेक करण्यात आली. चेंबूजवळ राज्य परिवहन मंडळाच्या बसेस सुद्धा फोडण्यात आल्या आहेत. अशाच प्रकारची तोडफोड औरंगाबादमध्ये सुद्धा दिसून आली आहे. मोकळे यांनी दावा केला, की बंद पाळण्यात आला तरीही महत्वाच्या ठिकाणी वाहतूक अडवली जाणार नाही. देशभर मोदी सरकारकडून एनआरसी आणि सीएए लागू करण्याची बळजबरी केली जात आहे. त्यालाच विरोध करताना हा बंद पाळण्यात येत असल्याचे ते पुढे म्हणाले.
‘बजरंग दल, भाजपच्या विरोधानंतरही महाराष्ट्र बंद पूर्णपणे यशस्वी झाला असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. वंचित बहुजन आघाडीने पुकारलेला महाराष्ट्र बंद ४ वाजता मागे घेण्यात आला असल्याची घोषणा प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेत केली. यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी बंदमध्ये सहभागी झालेल्या जनतेचे आभार मानले आहे. दरम्यान, दगडफेक करणारे चेहरा झाकून आले होते. वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी कुठेही तोडफोड केली नसल्याचा दावा, त्यांनी केला आहे.
प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदे दरम्यान सांगितले की, वंचितने पुकारलेला महाराष्ट्र बंद मागे घेत आहोत. आता लोकांचे जनजीवन पुन्हा सुरळीत होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. बंद दरम्यान तीन ते सव्वा तीन हजार कार्यकर्तयांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या कार्यकर्त्यांनी काही केले नसेल तर त्यांना सोडण्यात यावे तसंच त्यांच्यावरील गुन्हे मागे घेण्याची विनंती पोलिस यंत्रणांना करणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.
अकोला – सीएए व एनआरसीच्या विरोधात वंचित बहुजन आघाडी-भारिप-बमसंच्या नेतृत्वात शुक्रवारी अकोल्यात बंद पाळण्यात येत आहे. या बंद दरम्यान रेल्वे स्टेशन चौक परिसरात भाजप आमदार रणधीर सावरकर तसेच इतर काही नेते आणि आंदोलनकार्त्यांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. दुकाने बंद करण्यावरुन हा वाद झाल्याचे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. मात्र इतर नेत्यांनी मध्यस्थी केल्याने हा वाद वेळीच मिटला. बंद दरम्यान आंदोलनकर्त्यांनी पातुर रोडवरील भंडारजनजीक टायर जाळून रस्ता बंद केला होता. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी धाव घेत वाहतुकीचा मार्ग मोकळा केला.





