39.4 C
Gondiā
Sunday, June 21, 2026
Home यशोगाथा सहा हजार तिनशे रुग्णांना जन आरोग्य योजनेचा लाभ

सहा हजार तिनशे रुग्णांना जन आरोग्य योजनेचा लाभ

0
55

• 8 कोटी 40 लाख निधी खर्च
• मातृत्व योजनेत
 7000 लाभार्थी
• 1 लाख 85 हजार आयुष्यमान कार्ड वाटप

भंडारा, दि. 04:  गरीब व सामान्य रुग्णांच्या निवडक गंभीर आजारावर मोफत उपचार शस्त्रक्रिया करण्यासाठी राज्य महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना सुरू केली असून मागील पाच वर्षात भंडारा जिल्हयात  6365 रुग्णांना या योजनेचा लाभ देण्यात आला आहे. यासाठी शासनाने 8 कोटी 40 लाख 3 हजार रुपये खर्च करून गरीब रुग्णांना आरोग्य दिलासा दिला आहे.महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेत एकत्रित वार्षिक उत्पन्न एक लाख किंवा त्यापेक्षा कमी उत्पन्न असलेल्या पिवळे, केशरी, अंत्योदय आणि अन्नपूर्णा शिधापत्रिकाधारक कुटुंबाचा समावेश केलेला आहे. या योजनेत गंभीर आजारावर मोफत उपचार व शस्त्रक्रिया केल्या जातात. भंडारा जिल्हयात ग्रामीण भागामध्ये 33 प्राथमिक आरोग्य केंद्र व 193 उपकेंद्रांमार्फत शासनाच्या आरोग्यविषयक विविध योजना राबविल्या जातात. यात प्रामुख्याने महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, प्रधानमंत्री मातृवंदना योजना, जननी सुरक्षा योजना, सुरक्षित मातृत्व योजना या सारख्या योजनांचा समावेश आहे.

सन 2015 ते 2019 या पाच वर्षात 6365 लाभार्थ्यांनी जन आरोग्य योजनेचा लाभ घेतला. त्याचप्रमाणे प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेत जिल्ह्यातील 1 लाख 85 हजार 602 लाभार्थींना आयुष्यमान कार्ड वाटप करण्यात आले आहेत. भंडारा जिल्हयात सप्टेंबर 2018 पासून आयुष्यमान भारत योजना कार्यान्वित झाली आहे.कुपोषणामूळे महिलांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. त्याचप्रमाणे बाळाच्या पहिल्या सहामाहीत निव्वळ स्तनपान करण्याच्या त्यांच्या क्षमतेवर सुद्धा परिणाम होतो. हे टाळण्यासाठी केंद्र शासनाने जानेवारी 2017 पासून प्रधानमंत्री मातृवंदना योजना सुरू केली आहे. मागील तीन वर्षात या योजनेत  19 हजार 979 लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला आहे. यासाठी 4 कोटी 10 लाख रुपये खर्च करण्यात आला. या योजनेचा सकारात्मक परिणाम दिसून आला असून मातांच्या आरोग्यात सुधारणा झाली आहे.

गरोदर मातांना संस्थेत प्रसूती झाल्यानंतर ग्रामीण भागात 700 रुपये व शहरी भागात 600 रुपये जननी सुरक्षा योजनेत लाभ देण्यात येतो. मागील पाच वर्षात या योजनेत 28 हजार 776 गरोदर मातांना लाभ देण्यात आला आहे. यासाठी 2 कोटी रुपये निधी खर्च करण्यात आला. त्याचप्रमाणे प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व योजनेत गरोदर मातेकरिता विविध चाचण्या व सोनोग्राफी करून निदान करण्याची सोय करण्यात येते. सन 2016-17 ते सन 2019-20 या चार वर्षात जिल्हयातील 34 हजार 312 गरोदर मातांनी या योजनेचा लाभ घेतला असून त्यासाठी आरोग्य विभागाने 1 कोटी 90 लाख रुपये निधी खर्च केला आहे.

नागरिकांच्या आरोग्याला प्राधान्य

सामान्य नागरिकांना आरोग्य सुविधा नियमित व वेळेत मिळाव्या हा शासनाचा आग्रह असून जिल्हयात आरोग्याच्या विविध योजना राबविण्यात येत आहेत. सर्व सामान्य नागरिकांच्या आरोग्य सेवेसाठी आरोग्य विभाग तत्पर असून शासनाच्या विविध आरोग्यविषयक योजनांचा गरजूंनी लाभ घ्यावा. या सगळ्या योजना प्राथमिक आरोग्य केंद्रात सुद्धा उपलब्ध आहेत.

डॉ. मिलिंद मोटघरे,जिल्हा आरोग्य अधिकारी, भंडारा