गडचिरोली,दि.5: कुरखेडा तालुक्यातील खोब्रामेंढा गावाजवळच्या जंगलात पोलिस व नक्षल्यांमध्ये बुधवारला सकाळी चकमक उडाली. पोलिसांनी नक्षल्यांचे शिबिर उदध्वस्त केले असून, त्यांचे साहित्यही ताब्यात घेतले आहे.खोब्रामेंढा जंगलात नक्षल्यांचे शिबिर सुरु असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिस दलाच्या सी-६० पथकाच्या जवानांनी त्या भागात नक्षलविरोधी अभियान राबविण्यास सुरुवात केली. पोलिसांना पाहताच नक्षल्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. पोलिसांनी जोरदार प्रत्युत्तर देताच नक्षली जंगलातून पळून गेले. घटनास्थळावरुन पोलिसांनी नक्ष्ल साहित्य मोठ्या प्रमाणावर ताब्यात घेतले आहे. शिबिरात ६० ते ७० नक्षली होते. पोलिसांचा घातपात करण्याची त्यांची योजना होती. परंतु जवानांनी नक्षल्यांचे मनसुबे हाणून पाडले, असे पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी सांगितले.