महाराष्ट्रातील चार कलाकारांना राष्ट्रपतींच्या हस्ते ‘राष्ट्रीय ललित कला अकादमी पुरस्कार

0
122
The President, Shri Ram Nath Kovind presenting the Lalit Kala Akademi Awards to the Meritorious Artists, at a function, at Rashtrapati Bhavan, in New Delhi on March 04, 2020

नवी दिल्ली : ललित कला क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानासाठी महाराष्ट्रातील चार कलाकारांना आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते ‘राष्ट्रीय ललित कला अकादमी पुरस्कार’ प्रदान करण्यात आले.

सोलापूर येथील तेजस्विनी सोनवणे आणि मुंबई येथील सागर कांबळे, रतनकृष्ण साहा, दिनेश पांड्या यांना यावेळी राष्ट्रीय ललित कला अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाच्यावतीने राष्ट्रपती भवनात आयोजित कार्यक्रमात आज 61व्या राष्ट्रीय ललितकला अकादमी पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. केंद्रीय सांस्कृतिक मंत्री प्रल्हाद पटेल, मंत्रालयाचे सचिव योगेंद्र त्रिपाठी आणि ललित कला अकादमीचे अध्यक्ष डॉ.उत्तम पाचारणे यावेळी उपस्थित होते.

61व्या राष्ट्रीय ललित कला अकादमी पुरस्कारासाठी देशभरातून 5 हजार कलाकारांचे अर्ज  प्राप्त झाले होते, यातील 15 सर्वोत्कृष्ट कलाकारांची निवड करून त्यांना आजच्या समारंभात सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्रातील चार कलाकारांना यावेळी गौरविण्यात आले. 2 लाख रूपये, सन्मान चिन्ह आणि प्रशस्तीपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

तेजस्विनी सोनवणे यांना प्रिंट मेकींग क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी सन्मानित करण्यात आले. तेजस्विनी सोनवणे यांनी पुण्यातील भारती विद्यापीठाच्या फाईन आर्ट महाविद्यालयातून बॅचलर ऑफ फाईन आर्टचे तर मुंबईतील सर जे.जे. स्कूल ऑफ आर्ट येथून मास्टर ऑफ फाईन आर्टचे शिक्षण पूर्ण केले. मुंबई, दिल्ली, पटना, कोलकाता, भुवनेश्वर, खजुराहो येथील चित्रपद्रर्शनात त्यांनी सहभाग घेतला. 2017 मध्ये दक्षिण कोरियातील बुसान शहरात आयोजित आंतरराष्ट्रीय आर्ट फेअरमध्येही त्यांनी सहभाग घेतला आहे.

मुंबईतील डोंबिवली (पूर्व) येथील सागर कांबळे यांना पेंटींग श्रेणीमध्ये उत्कृष्ट कार्यासाठी गौरविण्यात आले. सर जे.जे. स्कूल ऑफ आर्ट मधून क्रिएटीव्ह पेंटींगचे शिक्षण पूर्ण करून सागर कांबळे यांनी कलाक्षेत्रातील प्रवास सुरू केला. देशभरात आयोजित क्रिएटीव्ह पेंटींगच्या कार्यशाळांमध्ये त्यांनी सक्रीय सहभाग घेतला. देश-विदेशातील महत्वाच्या संस्थांच्यावतीने आयोजित प्रदर्शनांमध्ये त्यांनी सहभाग घेतला. कलाक्षेत्रातील योगदानासाठी त्यांना 24 हून अधिक पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

मुंबईच्या सायन येथील रतनकृष्ण साहा यांना मुर्तीकलेतील उत्कृष्ट योगदानासाठी गौरविण्यात आले. श्री.साहा यांनी बडोदा येथील एम.एस.विद्यापीठातून मूर्तीकलेचे शिक्षण पूर्ण केले. मुंबई, दिल्ली, कोलकाता या शहरांमध्ये त्यांनी मुर्तीकला प्रदर्शनी लावली. ब्रिटेन आणि अमेरिकेतील मुर्तीकलेच्या समूह प्रदर्शनातही त्यांनी सहभाग घेतला. मूर्ती कलेतील योगदानासाठी त्यांना विविध राज्यांचे पुरस्कार व शिष्यवृत्या मिळाल्या आहेत.

मुंबईतील घाटकोपर(पश्चिम) येथील दिनेश पांड्या यांना आर्ट फोटोग्राफीतील उत्कृष्ट योगदानासाठी सन्मानित करण्यात आले. सर जे.जे.स्कूल ऑफ आर्ट मधून त्यांनी शिक्षण पूर्ण केले. मुंबई, बंगळुरु आणि चेन्नई आणि लंडनमध्ये त्यांनी चित्रप्रदर्शन लावले. त्यांनी देश-विदेशातील 15 समुह चित्रप्रदर्शनात सहभाग घेतला. 1989 मध्ये त्यांना ब्रिटीश कौन्सीलची फेलोशिफ मिळाली आहे.

राष्ट्रीय ललित कला अकादमीच्यावतीने दिल्लीतील मुख्यालयात 4 ते 22 मार्च 2020 दरम्यान आयोजित 61 व्या राष्ट्रीय ललित कला अकादमी प्रदर्शनीत पुरस्कार प्राप्त 15 कलाकारांसह एकूण 284 कलाकारांच्या कलाकृती प्रदर्शित करण्यात येणार आहेत.