
मुंबई, दि. 5 : राज्यभरातील रुग्णांची गरज लक्षात घेता राज्यातील सर्व जिल्ह्यात डायलिसिस उपचारपद्धती सुरू करण्यात आली आहे. येत्या काळात तालुकास्तरावरील रुग्णालयात डायलिसिस उपचार पद्धती आणि सीटी स्कॅन मशिन देण्यात येणार असल्याचे सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री राजेश टोपे यांनी विधानपरिषदेत सांगितले.सदस्या विद्या चव्हाण यांनी राज्यातील आरोग्यविषयक समस्येविषयीची लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. या लक्षवेधीला उत्तर देताना श्री. टोपे बोलत होते.
राज्यातील डायलेसिसच्या उपचाराची गरज लक्षात घेता पहिल्या टप्प्यात आठ तालुक्यात डायलेसिस उपचार पद्धती सुरू करण्यात येणार आहे. त्यानंतर राज्यभरातील सर्वच तालुक्यात ती उपलब्ध केली जाणार असल्याचे श्री. टोपे यांनी सांगितले. राज्यात २३ जिल्ह्यांमध्ये सीटी स्कॅन मशिन उपलब्ध असून त्यामार्फत रुग्णांचे निदान केले जाते. उर्वरित जिल्ह्यांमध्ये टप्प्या टप्प्याने सिटी स्कॅन मशिन उपलब्ध करून देण्याची कार्यवाही सुरू आहे. राज्यातील सर्व उपजिल्हा रुग्णालयात सीटी स्कॅन मशिन देण्याचा प्रयत्न आहे. ५० ते १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय असावे असा निकष यासाठी असणार आहे. कर्करोगावर उपचार करण्यासाठी राज्यात अकरा जिल्हा रुग्णालयामध्ये केमोथेरपी युनिटची स्थापना करण्यात आली असून त्याठिकाणी सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत मोफत उपचार दिला जात असल्याचे श्री. टोपे यांनी लक्षवेधीवरील चर्चेदरम्यान सांगितले.लक्षवेधीवरील चर्चेत विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, हुस्नबानो खलिफे, निरंजन डावखरे यांनी भाग घेतला.