
गोंदिया,दि.06ः- तालुक्यातील मोरवाही येथे ३ मार्च रोजी दहावीचा पेपर देऊन येणार्या अतुल तरोणे या विद्याथ्यार्चा हत्या झाली होती. दरम्यान, पोलीसांनी याप्रकरणातील आरोपीला ४ मार्च रोजी सायंकाळी अटक केली. सेवकराम मनीराम गुरुबेले रा. मोरवाही असे आरोपीचे नाव आहे. विशेष म्हणजे, ही हत्या प्रकरणातून झाली.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोरवाही येथील अतुल तरोणे याच्यासोबत आपल्या मुलीचे प्रेमसंबंध असल्याचा संशय आरोपी सेवकराम गुरुबेले होता. हे संबंध कसे तोडायचे याचा विचार गत अनेक दिवसापासून सुरु होता. दरम्यान ३ मार्च रोजी अतुल तरोणे हा इयत्ता दहावीचा पेपर देऊन गावशिवारातील तलावाजवळील शेतातून जात असताना संधी साधून सेवकरामने अतुलच्या डोके व तोंडावर कुर्हाडीने वार केले व पळ काढला. दरम्यान या परिसरातून जाणार्या नागरिकांना अतुल रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळल्याने त्यांनी याची माहिती अतुलच्या नातेवाईकांना दिली. माहिती मिळताच नातेवाईकांनी घटनास्थळ गाठून अतुलला जिल्हा सामान्य रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले. दम्यान पोलीसांनी अतुलच्या नातेवाईक, मित्रमंडळी व परिसरातील नागरिकांना विचारणा केली असता सेवकराम गुरुबेले याने अतुलची हत्या केल्याचे समोर आले. पोलीसांनी सेवकरामला त्याच्या घरुन अटक केली. चौकशीदरम्यान त्याने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र पोलीसी खाक्या पडताच त्याने आपल्या मुलीसोबत अतुलचे प्रेमसंबंध असल्याच्या रागात कुर्हाडीने त्याची हत्या केल्याची कबूली दिली. ही कारवाई गोंदिया ग्रामीणचे ठाणेदार प्रदिप अतुलकर, सहायक पोलीस निरीक्षक अभिजीत भुजबळ, रमेश गर्जे, दिलीप कुंदोजवार, पोलीस उपनिरीक्षक रोहीदास भोर, उमेश गुटाळ, बाबू मेंढे व पोलीस कर्मचार्यांनी केली.