गोंदिया,दि.09 : नगर परिषदेची सर्वसाधारण सभा येत्या शुक्रवारी (दि.१३) बोलाविण्यात आली असून यामध्ये म्हाडाकरीता आरक्षीत असलेल्याजागेचे आरक्षण हटवून राजकीय नेत्यांना लाभ पोचविण्याची तयारी नगरपरिषदेच्यावतीने सुरु करण्यात आली आहे.ही सभा तीनच विषयांसाठी ही घेतली जात असून या सभेतील पहिलाच विषय ग्राम सोनपुरी येथील जागा घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी खरेदी करण्याबाबतचा आहे. त्यानंतर नगर परिषदेची हद्द वाढविणे व नगर परिषद हद्दीत सेंट्रल हॉस्पीटल मागील म्हाडा करिता आरक्षीत जागेचे आरक्षण वगळण्याचा विषय मांडला जाणार आहे.”सध्याच्या हद्दीत नगरपरिषद नागरिकांना सुरळीत व्यवस्था देण्यात अपयशी ठरलेले असतांना हद्द वाढीचा प्रस्ताव म्हणजे अव्यवस्थेचा कळसच होणार आहे.गेल्या तीन चार वर्षात शहरातील घनकचरा व्यवस्थापनाचा प्रश्न अद्यापही नगरपरिषद सोडवू शकलेली नाही.एमआयडीसीमध्ये जागा घेत त्यावर स्वतःच प्रकल्प उभारण्यास नगरपरिषदेच्या पदाधिकार्यांच्या असलेला विरोधाने नगरपरिषदेच्या पारदर्शक भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा ठरला आहे.घनकचरा प्रकल्पाच्या विषयाला घेऊन तत्कालीन काँग्रेस नेते राकेश ठाकूर यांनी आवाज उठविला होता.मात्र त्यांचे नेते भाजपात गेल्यानंतर ते सुध्दा या विषयावर गप्प झाल्याचे दिसून येत आहेत.





