
गोंडपिपरी,दि.14ः- तालुक्यातील कोठारी रेंजमध्ये वनपरिक्षेत्रातील बामनी गावातील पुंडलिक मडावी यांच्या शेतात पट्टेदार वाघाचे साधारण एक वर्षाचे पिल्लू जखमी अवस्थेत आढळल्याने एकच खडबळ उडाली. घटना १३ मार्च रोजी सकाळी ९.३0 वाजताच्या सुमारास सदर शेतकरी गेल्यावर उघडकीस आली.
सकाळी साधारण ९.३0 वाजताच्या सुमारास पुंडलिक मडावी नेहमीप्रमाणे आपल्या शेतात भाजीपाला पिकाची पाहणी करण्याकरिता गेले असता वांग्याचे पिकात वाघाचे पिल्लू जखमी अवस्थेत पडून असल्याचे दिसून येताच त्यानी घाबरून गावात धूम ठोकली आणि गावकर्यांना माहिती दिली. गावातील नागरिक जमा होऊन प्रत्यक्ष पाहिले सदरचे वाघाचे पिल्लू गंभीर जखमी झालेल्या अवस्थेत दिसले.
गावकर्यांनी भ्रमणध्वनीद्वारे सदर माहिती वनरक्षक टेकाम यांना दिली असता त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन वाघाच्या पिल्लूवर जाळी टाकून त्याला संरक्षण दिले आणि आपल्या वरिष्ठ अधिकार्यांना माहिती दिली. परंतु, वरिष्ठ अधिकारी पोहचेपयर्ंत वाघाचे पिल्लू मृत पावले. वाघाचे पिल्लू वनाधिकारी यांनी आपल्या ताब्यात घेऊन शवविच्छेदन करण्यासाठी नेण्यात आले.