
भंडारा,दि.१४ः-मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणार्या जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक निवडणुकीसाठी शुक्रवारी आरक्षण सोडत निघाली. परंतु,ओबीसी आरक्षणावरील आक्षेपामुळे ही सोडत तब्बल दोन तास रखडली होती. आक्षेपाची पूर्तता झाल्यानंतर आरक्षणाची सोडत सुरळीत पार पडली. या सोडतीनंतर आता निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले असून, इच्छुकांच्या मोर्चेबांधणीला वेग आला आहे.विद्यमान आरोग्य शिक्षण सभापती धनेंद्र तुरकर यांचा मतदारसंघ महिलाकरीता राखीव झाल्याने त्यांच्यावर बाद होण्याची वेळ आली आहे.महिला बालकल्याण सभापतींना मात्र संधी मिळाली आहे.
भंडारा जिल्हा परिषद व सात पंचायत समितींची मुदत १४ जुलै रोजी संपत असल्याने त्यापूर्वी निवडणूक होणे अपेक्षित आहे. त्यासाठी शुक्र वारी जिल्हा परिषदेचे आरक्षण जिल्हाधिकार्यांच्या उपस्थितीत काढण्यात आले. दोन गटाच्या आरक्षण सोडतीनंतर ओबीसींच्या आरक्षणावर जि.प. सदस्य विनायक बुरडे यांनी आक्षेप घेतला. या आक्षेपाची पूर्तता करण्यासाठी प्रशासनाला दोन तासाचा अवधी लागला. त्यानंतर आरक्षण सोडत सुरळीत पार पडली. या आरक्षण सोडतीमुळे अनेक दिग्गजांचे क्षेत्र राखीव तसेच महिलांसाठी गेल्याने त्यांना धक्का बसला आहे.
आता इच्छुकांनी आपआपल्या क्षेत्रात जनसंपर्क वाढविण्यावर भर दिला आहे. लवकरच जिल्हा परिषद निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे.
असे आहे जिल्हा परिषदेचे आरक्षण
अनुसूचित जाती : परसोडी (महिला), पोहरा (महिला), आसगाव (महिला), मोहरणा (महिला), सरांडी बु. (महिला), भागडी (सर्वसाधारण), वडद (सर्वसाधारण), आष्टी (सर्वसाधारण), खमारी (सर्वसाधारण).
अनुसूचित जमाती-किन्ही/एकोडी (महिला), पहेला (महिला), पिंपळगाव को. (सर्वसाधारण), सानगडी (सर्वसाधारण)
ओबीसी (महिला)-सिहोरा, गर्रा/बघेडा, पाचगाव, वरठी, केसलवाडा/वाघ, कोथुर्णा, सावरला.
ओबीसी (सर्वसाधारण)-बपेरा, लाखोरी, मुरमाडी/सा., ठाणा, अड्याळ, ब्रम्ही, भूयार.
सर्वसाधारण (महिला)-सिल्ली, येरली, देव्हाडी, आंबागड, कांद्री, बेटाळा, करडी, कुंभली, पालांदूर, आमगाव, कोंढा, दिघोरी.
सर्वसाधारण-गणेशपूर, सावरी (ज.), चिखला, चुल्हाड, खापा, डोंगरगाव, आंधळगाव, पिंडकेपार, मुरमाडी/ तुप., धारगाव, पिंपळगाव/ निपानी, मासळ, खोकरला.