मुंबई/औरंगाबाद,दि.15 – पुणे, मुंबई पाठोपाठ आता औरंगाबादेतही कोरोनाचा रुग्ण आढळला आहे. शहरातील रुग्णालयात भरती झालेल्या महिलेचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी यांनी दिली. 59 वर्षीय ही महिला रशिया आणि कझाकिस्तान मध्ये गेली होती. भारतात परतल्यानंतर तिच्यात कोरोनाची लक्षणे दिसून आली आहोती. यामुळे ती शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल झाली होती. तिचे नमुने पुण्यात तपासणीसाठी पाठवले होते. आज तिचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यासोबतच राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 32 वर पोहोचला आहे.
यातील चार जण हे पुणे येथील पहिल्या दोन बाधित रुग्णांसोबत दुबई सहलीला गेलेल्या चमूपैकी आहेत.यापैकी एक रुग्ण औरंगाबाद, एक रुग्ण अहमदनगरला, दोन यवतमाळला, तर एक जण मुंबईत भरती आहे. या पाच जणांबरोबरच मुंबईत आणखी चार जण कोरोनाबाधित आढळले आहेत. यामध्ये हिंदुजा रुग्णालयात भरती असलेल्या आणि दुबई प्रवासाचा इतिहास असलेल्या रुग्णांची पत्नी आणि मुलगा यांचा समावेश आहे. मुंबईत आढळलेले इतर दोन रुग्ण हे 37 आणि 59 वर्षांचे पुरुष असून, त्यांचा अनुक्रमे अमेरिका व फ्रान्स आणि फिलिपाइन्स प्रवासाचा इतिहास आहे. नागपूर येथे भरती असलेला आणि कतार देशात प्रवासाचा इतिहास असलेला एक 43 वर्षीय पुरुषही कोरोनाबाधित असल्याचा अहवाल शनिवारी इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेने दिला. कोरोनाबाधित नऊ रुग्णांपैकी एक महिला आहे.राज्यात आतापर्यंत बाधित भागातून एकूण 949 प्रवासी आले आहेत. 18 जानेवारीपासून ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात 663 जणांना भरती करण्यात आले आहे. शनिवारपर्यंत भरती करण्यात आलेल्यापैकी 538 जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोनासाठी निगेटिव्ह आले आहेत, तर 26 जण पॉझिटिव्ह आहेत.
राज्यात 131 संशयित रुग्ण भरती
राज्यात शनिवारी 131 संशयित रुग्णांना भरती करण्यात आले आहे. सध्या 14 जण पुणे येथे, तर 72 जण मुंबईत भरती आहेत. याशिवाय शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर येथे 16, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, यवतमाळ येथे नऊ आणि वायसीएम रुग्णालय पिंपरी चिंचवड येथे तीन संशयित रुग्ण भरती आहेत.
आयआयटी’चे वर्ग 29 मार्चपर्यंत बंद
आयआयटी मुंबईमधील सर्व वर्ग, सेंट्रल लायब्ररी आणि प्रयोगशाळा या 29 मार्च 2020पर्यंत आयआयटी प्रशासनाकडून पुढील निर्देश येईपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत.
महिला राहत असलेल्या भागाची करणार तपासणी
महिलेचा पॉझिटिव्ह अहवाल आल्यानंतर जिल्हा शल्य चिकित्सक खाजगी रुग्णालयाला भेट देण्यास तातडीने रवाना झाले आहेत. तसेच ज्या भागात ही महिला राहत होती, त्या भागातील 3 किमी परिसरात तपासणी करण्याच्या सुचना मनपाला देण्यात येणार आहे. अशी माहिती सुंदर कुलकर्णी यांनी दिली आहे. संबंधित महिलेमुळे आजूबाजूच्या परिसरातील लोकांसोबत संपर्क झाला का याची तपासणी करण्यात येणार असल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले