नागरिकांनी घाबरून जाऊ नये, दक्षता घ्यावी-डॉ. कादंबरी बलकवडे

0
300

गोंदियादि. १७ : कोरोना विषाणूच्या संभाव्य धोक्यापासून सावधगिरीचा उपाय म्हणून सार्वजनिक ठिकाणी नागरिकांनी गर्दी करू नये. प्रत्येक नागरिकाने आपल्या आरोग्याची काळजी घेऊन कोरोनाचा संसर्ग होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात सभागृहात 16 मार्च रोजी आयोजित आढावा बैठकीत डॉ. बलकवडे बोलत होत्या. बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजा दयानिधी, सहाय्यक जिल्हाधिकारी रोहन घुगे, पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. श्याम निमगडे, उपजिल्हाधिकारी सुभाष चौधरी, प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संगीता पाटील, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. विनायक रुखमोडे, जिल्हा पुरवठा अधिकारी देवराव वानखेडे, सर्व उपविभागीय अधिकारी, सर्व तहसीलदार तसेच विविध हॉटेल्सचे मालक यावेळी उपस्थित होते.

डॉ. बलकवडे म्हणाल्या, हॉटेल मालकांनी त्यांच्या हॉटेलमध्ये येणाऱ्या ग्राहकांना कोरोनाबाबत दक्षता घेण्याबाबतची माहिती द्यावी. बाहेर देशातून जिल्ह्यात आलेल्या व्यक्तीने स्वतः पुढाकार घेऊन 14 दिवस घरीच विलगीकरण कक्ष स्थापन करून राहावे. गोंदिया शहरातील मरारटोली येथील नगर परिषदेच्या शाळेमध्ये आणि लईटोला येथे विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात आल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

आरोग्य विभागाची हेल्पलाइन नंबर १०४ तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा आपत्ती निवारण कक्षातील (०७१८२-२३०१९६) या क्रमांकावर तसेच राज्य नियंत्रण कक्षातील ०२०-२६१२७३९४ हेल्पलाइनवर संपर्क साधावा, असे सांगून डॉ. बलकवडे म्हणाल्या, जिल्ह्यात सार्वजनिक ठिकाणी असलेल्या शौचालयात हात धुण्यासाठी साबण उपलब्ध करून द्यावेत. या विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी साबणाने वारंवार हात धुवावे, असे त्या म्हणाल्या. डॉ. बलकवडे यांनी के.टी.एस. जिल्हा सामान्य रुग्णालय आणी मरारटोली येथील नगरपरिषदेच्या शाळेत तयार करण्यात आलेल्या विलगीकरण कक्षाला भेट दिली.

कोरोनाबाबत अफवा पसराविणाऱ्यावर होणार कारवाई

गोंदियादि. १७ : कोणत्याही व्यक्तीस/संस्था, संघटनांना कोव्हीड-१९ अर्थात कोरोना याबाबत कोणत्याही प्रकारच्या अफवा, अनधिकृत माहिती इलेक्ट्रॉनिक किंवा सोशल मिडीयाच्या माध्यमातून पसरविणाऱ्यावर प्रतिबंध करण्यात येत आहे. याबाबत आयुक्त, आरोग्य सेवा व संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान, संचालक, आरोग्य सेवा मुंबई, संचालक, आरोग्य सेवा पुणे व संचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन मुंबई, विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्यामार्फतच अधिकृत माहितीचे प्रसारण करण्यात येणार आहे. याबाबतची कोणतीही अनधिकृत माहिती अथवा अफवा पासाराविणाऱ्या व्यक्ती अथवा संस्था अथवा या कायद्यान्वये कायदेशीर व दंडनीय कारवाईस पात्र राहतील.