निर्भयाच्या चारही मारेकऱ्यांना अखेर तिहार तुरुंगात पहाटे 5.30 वाजता सुळावर लटकवले

0
325

नवी दिल्ली(वृत्तसंस्था)दि.20 – दिल्लीतील सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील चारही आरोपींना आज सूर्योदयापूर्वीच फासावर लटकवण्यात आले. निर्भया आणि तिच्या कुटुंबियांना अखेर 2650 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर न्याय मिळाला. चारही दोषी विनय कुमार शर्मा, पवन कुमार गुप्ता, मुकेश सिंह आणि अक्षय कुमार सिंह यांना पहाटे 5.30 वाजता फाशी देण्यात आली आहे. निर्भयाच्या दोषींना फासावर लटकवल्याच्या वृत्तावर तिहार तुरुंगाचे महासंचालक संदीप गोयल यांनी शिक्कामोर्तब केले. तिहार जेलमधील क्रमांक तीनच्या तुरुंगात त्यांना फाशी देण्यात आली आहे. फाशीनंतर डॉक्टरांनी चारही दोषींची रितसर मेडिकल टेस्ट घेतल्यानंतर त्यांना मृत घोषित केले. तिहार तुरुंगाबाहेर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

चारही दोषींना फाशी झाल्यानंतर निर्भयाच्या आईने आपल्या मुलीच्या फोटोला घट्ट मिठी मारली आणि निर्भयाला अखेर न्याय मिळाला असे उच्चारले. निर्भयाला न्या मिळवून देण्यासाठी मी न्यायव्यवस्था आणि भारत सरकारचे आभार मानते. आजचा दिवस देशातील महिला आणि मुलींच्या नावे समर्पित आहे. आम्ही फाशीचा आनंद साजरा करणार नाही. पण मी हे जरुर सांगेन की या फाशीनंतर आता गुन्हेगारांमध्ये धाक निर्माण होईल. आजचे सूर्य माझ्या मुलीच्या नावे. देशातील तमाम महिला आणि मुलींचे देखील आभार अशी प्रतिक्रिया निर्भयाच्या आईने दिली.

अशी झाली फाशी…

7 वर्षे, 3 महीने आणि 4 दिवसानंतर निर्भयाला अखेर न्याय मिळाला. तीच निर्भया जिच्यावर 16 डिसेंबर 2012 च्या रात्री दिल्लीत चार नराधम मुकेश, अक्षय, विनय आणि पवनने बलात्कार केला होता. या दोषींच्या विरोधात कनिष्ठ न्यायालयाने 9 महिन्यांच्या आतच फाशीची शिक्षा सुनावली होती. 6 महिन्यानंतर दिल्ली हायकोर्टाने ही शिक्षा कायम ठेवली. त्यानंतर मे 2017 सुप्रीम कोर्टने देखील फाशीवर शिक्कामोर्तब केला होता. तरीही फाशी होता-होता 2 वर्षे 10 निघून गेले. कोर्टाने शुक्रवारी फाशीची तारीख निश्चित केली होती. तत्पूर्वी दोषींनी 15 तासांत 6 याचिका देखील केल्या. त्या सर्व फेटाळून लावण्यात आल्या. यानंतर पहाटे 5 वाजता फाशी तयारी सुरू झाली. दोषींना फाशीच्या फळीपर्यंत नेण्यात आले. चौघांचे हात-पाय बांधण्यात आले. यावेळी विनय रडत होता. तरीही दोषींच्या गळ्यात फाशीचे दोरखंड टाकण्यात आले. चेहरा झाकण्यात आला आणि जल्लादाने लीवर ओढले. फाशी होताच जणू देशाला न्याय मिळाला अशी भावना सर्वच देशवासियांमध्ये होती. तुरुंग प्रशासनाने 7 मिनिटानंतर चौघांच्या मृत्यूची माहिती जारी केली. त्याच्या 30 मिनिटानंतर डॉक्टरांनी सुद्धा तपास करून दोषींना मृत घोषित केले.