गोंदिया,दि.21: कोरोना विषाणूंचा प्रसार रोखण्यासाठी राज्याच्या परिवहन महामंडळानेसुध्दा कंबर कसली आहे. लोकवाहिनी एसटीत गर्दी व दाटावाटीने होणार्या प्रवासामुळे होणारा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आसन व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. त्यानुसार सुरक्षित अंतर ठेवून मोजक्याच प्रवाशांना प्रवास करून दिला जात आहे. परिवहन विभागाने बसमधील बैठक व्यवस्थेच्या बदललेल्या रचनेनुसार दोघांच्या सीटवरील रांगेत फक्त एकाच व्यक्तीला बसण्याची परवानगी देण्यात आली आहे. तसेच गर्दी टाळण्यासाठी कोणत्याही बस मधून प्रवास करण्याची परवानगी नाकारण्यात येत आहे. त्यातच जिल्ह्यातील एसटीच्या व खासगी वातानुकूलित बसेस तत्काळ बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे सामान्य बसेसवरील ताण वाढला आहे. वातानुकूलित बसेसमधून सधन व उच्चभू्र नागरिक प्रवास करतात. परंतु या बसेसना ३१ मार्च पर्यंत बंदी घालण्यात आली आहे. दररोज प्रवास करणार्या नागरिकांसाठी एसटी प्रवास हे सोयीचे माध्यम आहे. हजारो नागरिक बसने शहरी, निमशहरी व ग्रामीण भागात प्रवास करतात. शाळा, महविद्यालये तूर्तास बंद आहेत. परंतु दररोज व्यापार,कार्यालयीन कामे, खरेदी आदी कामासाठी नागरिकांचे अवागमन सुरु असते. याशिवाय नागपुर, भंडारा व जिल्ह्यातील इतर भागात दररोज अपडाऊन करणार्या कर्मचार्यांची संख्या मोठी आहे. परंतु कोरोना इफेक्टमुळे परिवहन विभागाने केलेल्या बदलाचा फटका प्रवाशांना बसला आहे. बसमध्ये क्षमतेच्या फक्त ५० टक्केच प्रवासी नेले जात आहेत. त्यामुळे जागा रिक्त असूनही प्रवाशांना बसस्थानकावर ताटकळत थांबावे लागत आहे. एरव्ही गर्दीत दाटीवाटीने व उभे राहून सुध्दा प्रवास करणारे प्रवासी सुटसुटीतपणे जाणार्या बसेस पाहून संताप व्यक्त करीत आहे. अनेकांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे.
एसटीच्या उपाययोजना बसस्थानके व बस सॅनिटायझर वापरून स्वच्छ केल्या जात आहेत. कर्मचार्यांना मास्क व सॅनिटायझर बाटली देण्यात येत आहे. प्रत्येक बसस्थानकावरील उद्घोषणा यंत्राद्वारे प्रवाशांना कोरोना आजारासंदर्भात जनजागृती करण्यात येत आहे. या उपाययोजनांच्या बरोबरच गर्दीच्या वेळी प्रवाशांमधील संभाव्य संसर्ग टाळण्याच्या दृष्टीने, त्यांच्या बसमधील बैठक व्यवस्थेमध्ये आमुलाग्र बदल करण्यात आला आहे. आवश्यकता वाटल्यास अशा ठिकाणी जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. या बाबत सविस्तर परिपत्रक एसटी महामंडळाच्या वाहतूक विभागामार्फत निर्गमित करण्यात आले असून प्रवाशांनी कोरोना विषाणूंचा संसर्ग टाळण्यासाठी एसटीच्या या उपाययोजना सहकार्य करावे,असे आवाहन एसटी महामंडळाकडून करण्यात येत आहे.