कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी अलगीकरण व विलगीकरणासाठी अधिकारी नियुक्त

0
95

गोंदिया,दि.21 : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून केंद्र व राज्य शासनाकडून १५ फेब्रुवारी २०२० व त्यानंतर चीन, इटली, इराण, दक्षिण कोरिया, प्रâांस, स्पेन, जर्मनी या कोरोना संसर्ग बाधित ७ देशातून किंवा या देशामार्गे अथवा या देशास भेट देवून आलेल्या प्रवाशांची विमानतळावर तपासणी करून त्यांना अलगीकरण व आवश्यकतेनुसार विलगीकरण करणे अनिवार्य करण्यात आलेले आहे. त्यानुसार अशा अलगीकरण करण्यात आलेल्या व्यक्तीच्या बाबतीत नमूद सूचनांची अंमलबजावणी करावयची आहे. त्यामध्ये अशा व्यक्तींना निवडणुकीसाठी वापरण्यात येणार्‍या इंडेलिबल शाईने त्यांच्या तळहाताच्या पाठीमागे दिसेल अशा ठिकाणी अलगीकरणाचा कालावधी नमूद केलेला स्टँप मारण्यात यावा. हा स्टँप १४ दिवस हातावर दिसू शकतो, अशा प्रकारे मारण्यात यावा. या सूचनेची अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने पुढील अधिकार्‍यांची जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार नेमणूक करण्यात आली आहे.
यामध्ये तालुका आरोग्य अधिकारी, गोंदिया डॉ. वेदप्रकाश चौरागडे, तालुका आरोग्य अधिकारी, तिरोडा डॉ. शीतल हारोडे, तालुका आरोग्य अधिकारी, गोरेगाव डॉ. कीर्ती चुलपार, तालुका आरोग्य अधिकारी, आमगाव डॉ. भूमेश पटले, तालुका आरोग्य अधिकारी, सालेकसा डॉ. गगन गुप्ता, तालुका आरोग्य अधिकारी, देवरी डॉ. ललित कुकडे, तालुका आरोग्य अधिकारी अर्जुनी/मोरगाव डॉ. विजय राऊत यांची नेमणूक करण्यात आली आहे. वरील अधिकार्‍यांनी आदेशित केल्याप्रमाणे कार्यवाही करावी. पुरविण्यात आलेला स्टँप व इंडेलिबल शाईचा गैरवापर होणार नाही, याची दक्षता घ्यावी. पुरविण्यात आलेल्या साहित्याच्या योग्य वापरासाठी संबंधित अधिकार्‍याची जबाबदारी राहील, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या अध्यक्ष डॉ. कादंबरी बलकवडे यांनी आदेशात नमूद केले आहे.

विषाणूच्या संसर्गापासून बचावासाठी स्वत:च खबरदारी घ्या
कोरोना विषाणू हा संसर्गजन्य आहे. या विषाणूच्या संसर्गावर आळा घालण्यासाठी नागरिकांनी स्वत:च जबाबदारी घेणे गरजेचे आहे. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे, सुरक्षित अंतर ठेवूनच दैनंदिन व्यवहार करणे, वारंवार हात धुणे, शिंकताना किंवा खोकलताना तोंडावर कापड घ्यावे, वारंवार डोळे व तोंडाला स्पर्श करू नये आदि बाबींची खबरदारी घेणे आवश्यक आहे. यामुळे संसर्गापासून प्रत्येक व्यक्ती स्वत:ला सुरक्षित ठेवू शकतो.

प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांचा सहकार्य हवा
शासनस्तरावर कोरोना विषाणूचा संसर्गाची युध्द पातळीवर खबरदारी घेतली जात आहे. गर्दीचे ठिकाण प्रतिबंधित करण्यात आले आहे. बाजार, मॉल, जलतरण, शाळा, महाविद्यालय, कोचिंग क्लासेस, कार्यक्रम, सभा, सिनेमागृह यासारखे गर्दी होणार्‍या ठिकाणांना बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. विषाणूच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांचे सहकार्यच आवश्यक राहणार आहे.