मुंबई(वृत्तसंस्था)दि.21- कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव हळु-हळू राज्यात वाढत आहे. राज्यात आता कोरोनाग्रस्तांची संख्या 52 वरुन थेट 63 वर गेली आहे. त्यापैकी 8 जण परदेश दौऱ्यावरून आलेले रूग्ण आहेत तर 3 जणांना संसर्गामुळे करोनाची लागण झाल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली. या 11 पैकी 10 जण हे मुंबईचे आहेत. भारतातही कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढतच आहे, यात सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात आहेत. याबाबत चर्चा करण्यासाठी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शरद पवारांची भेट घेतली. एका वृत्त वाहिनीशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.
ते म्हणाले की, ‘शरद पवारांशी चर्चा झाली, त्यांना सध्याची परिस्थिती सांगितली. केंद्राने आपल्याला चाचण्यांची परवानगी द्यावी, मेडिकल कॉलेजमध्ये टेस्टिंग लॅब आम्हाला करायच्या आहेत, फक्त किट्स केंद्राने उपलब्ध करुन द्यावेत, अशी विनंती आम्ही त्यांच्याकडे केली.’
पुढे ते म्हणाले की, या चर्चेदरम्यान, पवारांनी तातडीने केंद्र सरकार आणि आरोग्य मंत्र्यांशी फोनवरुन चर्चा केली. शरद पवारांनी केंद्रीय आरोग्य मंत्र्यांशी 20 मिनिटे चर्चा केली. राज्य सरकार मेडिकल कॉलेजना सर्व उपकरणे देण्यास तयार आहे. पण मेडिकल कॉलेजसना कोरोना टेस्टिंग किट केंद्राने उपलब्ध करुन द्यावी, ही आमची केंद्राकडे मागणी आहे, असेही टोपे म्हणले.