कोरोनाबाबत दिशाभूल करणाऱ्यावर गुन्हा दाखल

0
191

अमरावती दि.२१: एका व्यक्तीला फोन करुन कोरोनाबाबत खोटी माहिती देवून दिशाभूल करणाऱ्या व्यक्तीविरुध्द खोलापुरीगेट पोलिसांनी फौजदारी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिस सूत्रानुसार, अंबागेट येथील इंद्रभुवन थिएटर मधील रहिवासी बाळु शिवआप्पा हिंगमिरे हे त्यांच्या घरी जेवन करीत असतांना त्यांना एका मोबाईलधारकाने फोन करुन राजेंद्र पांढरे या तुमच्या घरी काम करणाऱ्या व्यक्तीला कोरोना झाला आहे, असे म्हटले. बाळु हिंगमीरे हे सामान्य रुग्णालयात जाऊन वैद्यकीय अधिकारी यांना भेटले असता वैद्यकीय अधिकारी यांनी सदर आजार हा सामान्य असून याला घाबरण्याचे कारण नाही, असे सांगितले. राज्यात कोरोना विषाणुचा संसर्ग व प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाकडून वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात आहे. त्याचप्रमाणे शासनाने अधिसूचना काढून कोणत्याही व्यक्तीला, संघटनांना कोवीड १९ याबाबत कोणत्याही प्रकारची अफवा अनधिकृत माहिती कोणत्याही माध्यमातून पसरविण्यात प्रतिबंध करण्यात येत आहे. अशी अधिसूचना असून सुध्दा यातील मोबाईलधारकाने खोटी माहिती दिल्याने त्या व्यक्तीविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.