रायपूर(वृत्तसंस्था)दि.22 – छत्तीसगडच्या सुकमा भागात शनिवारी सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत 7 जवान शहीद तर 10 जखमी झाले आहे. तर पाच ते सहा नक्षलवादी ठार झाले असून अनेक जण जखमी झाल्याची माहिती आहे. सैनिकांना ठार केलेल्या एका नक्षलवाद्याचा मृतदेह ताब्यात घेतला आहे. त्याचबरोबर जखमी जवानांना विमानाने रायपुरला आणण्याची तयारी सुरू आहे. यातील अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे.
छत्तीसगडचे डीजीपींनी जारी केलेल्या सुचनेनुसार, या चकमकीत पाच ते सहा नक्षलवादी ठार झाले आहेत. तर इतकेच नक्षलवादी जखमी झाल्याचा अंदाज आहे. चकमकीत डीआरजीचे काही जवान जखमी झाले आहेत. जखमी जवानांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सैनिक जंगलातून परत आल्यानंतर अधिक माहिती मिळेल.
टीसीओसी दरम्यान नक्षलवाद्यांनी जवानांना जाळ्यात अडकवले
कासलपाड परिसरात पोलिसांना मोठ्या प्रमाणात नक्षलवादी असल्याची बातमी मिळाली होती. यानंतर यानंतर डीआरजी आणि एसटीएफची टीम शुक्रवारी दोरनापाल येथून रवाना झाली. ही टीम बुरकापालला पोहोचली आणि येथून कोबराच्या जवानांची एक तुकडी यांच्यासोबत नक्षलवाद्यांचा एन्काउंटर करण्यासाठी निघाली. असे म्हटले जात आहे की, जवान नक्षलवाद्यांना सरप्राइज एन्काउंटरमध्ये अडकवण्याचा प्रयत्न करणार होते, परंतु जवान जंगलात घुसल्याची बातमी आधीच नक्षलवाद्यांपर्यंत पोहोचली होती.
नक्षवलवाद्यांनी रणनितीनुसार जवानांना जंगलात येऊ दिले
नक्षलवाद्यांनी रणनितीनुसार जवानांना जंगलात येऊ दिले. जवान कसालपाडच्या पुढे गेले आणि नक्षलवाद्याची कोणतीच हालचाल दिसली नाही तेव्हा माघारी फिरू लागले. सुरक्षा दल कासलपाडच्या बाहेर येताच नक्षलवाद्यांनी पेरलेल्या जाळ्यात अडकले. नक्षलवाद्यांनी कासलपाडच्या काही अंतरावर कोराज डोंगरीजवळच्या डोंगरावरून जवानांवर हल्ला केला. अचानक झालेल्या गोळीबारात काही जवान जखमी झाले तर काही शहीद झाले. यानंतर दोन्ही बाजूंनी गोळीबार झाला. या दरम्यान, सैनिकांनी जखमी व शहीद जवानांना घटनास्थळावरून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, तेव्हा इतर जवानांना गोळ्या लागल्या.