मुंबई,दि.23ः- कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी महावितरणला आपल्या दैनंदिन कार्यपद्धतीत बदल करण्याचे आदेश राज्याचे उर्जामंत्री, डॉ. नितीन राऊत यांनी आज दिले असून ग्राहकांशी रोजचा होणारा संपर्क टाळण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत.
23 मार्चपासून मीटर रिडींग करण्यासाठी व बिलाचे वितरण करण्यासाठी ग्राहकांच्या घरी पुढील आदेश येईपर्यंत जाऊ नये. या काळात मीटर रिडींग न झाल्यामुळे ग्राहकांना सरासरी बिल पाठविण्याची सूचना त्यांनी दिली. या काळात वीज बिलाची छपाई करण्यात येणार नाही. तथापि महावितरणच्या वेबसाईटवर बिले उपलब्ध करून देण्यात यावी असेही त्यांनी आदेश दिले आहेत. सोबतच ग्राहकांनी महावितरणकडे नोंदविलेल्या मोबाईल नंबरवर बिलासंबंधीचे एस.एम.एस.द्वारे संदेश पाठविण्यात येणार आहे.
या कालावधीत थकबाकीसाठी ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित न करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. वीजचोरी व बिलासंबंधीच्या तक्रारीला अनुसरून ग्राहकांच्या घरी महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी भेटी देऊन तपासणी करू नये अशा सूचना डॉ. राऊत यांनी महावितरण प्रशासनाला दिल्या आहेत.
Regards,