सालेकसा,दि. 23:नक्षल दृष्ट्या अतिसंवेदनशील व मागास म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सालेकसा तालुक्यातील अतिसंवेदनशील भागात असलेल्या विचारपुर या गावात समाज कार्यात तालुक्यात सदैव अग्रेसर असलेल्या गोटूल आदिवासी बहुउद्देशीय संस्था सालेकसा च्या वतीने टोयागोंदी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या विचारपुर या गावात कोरोना विषयक जनजागृती करण्यात आली.
कोरोणा हा रोग ग्रामीण भागात पसरू नये त्यासाठी कोणकोणत्या गोष्टी पाळायला पाहिजेत त्यावर सविस्तर मार्गदर्शन संस्थेच्या वतीने गावकऱ्यांना करण्यात आलेत. कोरोना हा रोग झपाट्याने सर्वत्र पसरत असून सर्वांनी सतर्क व्हावे तसेच शासकीय सूचनांचे पालन करावे याविषयी सविस्तर मार्गदर्शन उपस्थितांना संस्थेच्या वतीने करण्यात आले. तसेच उपस्थित गावकऱ्यांना जंतूनाशक असलेल्या निलगिरीच्या तेलाचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी संस्था अध्यक्ष वंदनाताई मेश्राम, सरपंच गंगाताई मडावी, संस्थेचे सहसचिव पवन पाथोडे तसेच इतर मान्यवरांसह गावकरी मंडळी उपस्थित होते.