गोंदिया दि. 24: कोरोना विषाणूचा वाढता फैलाव रोखण्यासाठी विविध प्रकारच्या प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्यात येत आहे.यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा लागू करण्यात आला आहे.जिल्ह्यातील नागरिकांना या विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अध्यक् डॉ. कादंबरी बलकवडे यांनी एका आदेशाद्वारे जिल्ह्यात सुरू असणारे सर्व सेतू केंद्र, आधार केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र व सीएससी केंद्र बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
अर्जदार सदर केंद्रामधून अर्ज दाखल करण्याऐवजी स्वतः ऑनलाईन अर्ज दाखल करू शकतो. तसेच एखाद्या अत्यावश्यक प्रकरणी अर्जदाराने संबंधित तहसिलदार यांचेकडे संपर्क साधल्यानंतर प्रकरणनिहाय गुणवत्तेनुसार उपविभागीय दंडाधिकारी/तहसीलदार यांनी निर्णय घेऊन प्रकरण निकाली काढणे बंधनकारक राहील.
या आदेशाची अंमलबजावणी सर्व उपविभागीय दंडाधिकारी,सर्व उपविभागीय पोलिस अधिकारी व सर्व तहसीलदार यांनी आपल्या अधिकार क्षेत्रात करावी. आदेशाचे पालन न करणाऱ्या संबंधित व्यक्ती व संबंधित विभाग प्रमुख यांचेवर भारतीय दंड संहिता कलम 1860 च्या कलम 188 नुसार कारवाई करण्यात येईल.