मुंबई,दि.24 – महाराष्ट्रात कोरोनाचा चौथा बळी गेला आहे. आज मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात 65 वर्षीय कोरोनाग्रस्त व्यक्तीचा मृत्यू झाला. या व्यक्तीला मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा त्रास होता अशी माहिती आहे. यासोबत यापूर्वी मुंबईतच 3 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला होता.
संयुक्त अरब अमिरात येथून परतल्यानंतर झाला कोरोना
मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत मृत्यूमुखी पडलेली व्यक्ती नुकतेच संयुक्त अरब अमिरात येथून अहमदाबादला आली होती. तेव्हापासूनच तिला ताप, खोकला आणि श्वास घेण्यात त्रास निर्माण झाला. या व्यक्तीला कोरोना व्हायरससह हाय ब्लड प्रेशर आणि मधुमेहाचा त्रास देखील होता. या रुग्णावर मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरू होते. 20 मार्च पर्यंत त्याची प्रकृती स्थिर होती. परंतु, सोमवारी उपचारादरम्यान या व्यक्तीची प्रकृती अचानक बिघडली आणि सोमवारी संध्याकाळीच त्याचा मृत्यू झाला.
राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 101 वर पोहोचली आहे
राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. आज राज्यातील कोरोनाग्रस्तांनी शंभरी पार केली आहे. पुण्यात 3 तर साताऱ्यात आणखी एक कोरोना रुग्ण आढळला आहे. यासोबतच राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 101 वर पोहोचली आहे. कोरोनाचा आकडा मर्यादित ठेवण्यासाठी संचारबंदीचे पालन करण्याची आवश्यकता आहे.
गेल्या बारा तासात महाराष्ट्रात कोरोनाचे चार रुग्ण सापडले आहेत. पुण्यातील तीन जणांचे कोरोना रिपोर्ट आज सकाळी पॉझिटिव्ह आले. दोन रुग्ण खाजगी हॉस्पिटलमध्ये आहेत, तर एक रुग्ण नायडू रुग्णालयात उपचार घेत आहे. पुणे शहरातील एकूण रुग्णांचा आकडा 19 वर पोहोचला आहे. साताऱ्यात काल रात्री एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. कॅलिफोर्नियाहून प्रवास करुन आलेली 63 वर्षीय व्यक्ती कोरोनाबाधित झाली आहे. साताऱ्यात एका दिवसात दोन रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला.