वाशिम, दि. २४ : कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठीच्या उपाययोजनांचा भाग म्हणून जिल्ह्यात फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ (१) व (३) अन्वये ३१ मार्च २०२० पर्यंत संचार बंदी आदेश लागू करण्यात आले आहेत. या आदेशाचे उल्लंघन करणारी कोणतीही व्यक्ती, संस्था या तरतुदींचा भंग करतील त्यांच्यावर साथरोग कायदा १८९७, आपत्ती व्यवस्थापना कायदा २००५ आणि इतर कायदे व फौजदारी दंड प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४, भारतीय दंड संहिता १८६० चे कलम १८८ व इतर संबंधित कायदे व नियम यांचे अंतर्गत कार्यवाही करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी हृषीकेश मोडक यांनी दिलेल्या या आदेशात नमूद करण्यात आले आहे.
अत्यावश्यक आणि नाशवंत वस्तू वगळता अन्य सर्व वस्तूंच्या दळणवळणासाठी जिल्ह्याच्या सर्व सीमा बंद करण्यात आल्या आहेत. एसटी महामंडळाच्या बसेससह आंतरराज्यीय बसेस, बस व प्रवासी व वाहतूक सेवा बंद राहतील. चालकाव्यतिरिक्त अन्य दोन व्यक्तींसाठी टॅक्सी तर एका प्रवाशासह ऑटो रिक्षा यांना आदेशात परवानगी दिलेल्या कारणांसाठी वाहतूक करता येईल. अत्यावश्यक वैद्यकीय सेवेसाठी प्रवासी वाहतूक करण्यास परवानगी देण्यात आली आहे. अत्यावश्यक वस्तू, आरोग्यसेवा आणि या आदेशात नमूद करण्यात आलेल्या बाबी यांकरिता वाहनचालकांव्यतिरिक्त एका व्यक्तीला खासगी वाहन उपयोगात आणता येईल. एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाणाऱ्या बससेवा आणि खासगी प्रवासी वाहतूक सेवा यांना बंदी असेल.
घरीच ज्यांचे विलगीकरण करण्यात आले आहे, त्यांनी आदेशाचे तंतोतंत पालन करावे, अन्यथा त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. तसेच त्यांना शासकीय विलगीकरण व्यवस्थेत स्थलांतरित केले जाईल. सर्व रहिवाशांनी घरातच थांबावे. केवळ परवानगी दिलेल्या कारणास्तव त्यांना बाहेर पडता येईल. तथापि, बाहेर पडल्यानंतर त्यांना परस्परांपासून किमान अंतर राखण्याच्या सूचना पाळणे आवश्यक असेल. सार्वजनिक ठिकाणी पाचपेक्षा जास्त व्यक्तींनी एकत्र येण्यास बंदी राहील.
जिल्ह्यातील सर्व दुकाने, आस्थापनांचे कामकाज बंद राहील. तथापि, वस्तूंची निर्मिती करणारे व प्रक्रिया सातत्य आवश्यक असलेले कारखाने, औषध विक्री आदी सुरू ठेवण्यास परवानगी राहील. तसेच डाळ, तांदूळ, अन्नधान्यविषयक बाबी, दूधविषयक पदार्थ, पशुखाद्य अशा अत्यावश्यक वस्तूंच्या निर्मितीच्या कारखान्यांना त्यांची कामे सुरू ठेवण्यास परवानगी असेल.
सरकारी कार्यालये आणि परवानगी दिलेली दुकाने आणि आस्थापने कमीतकमी कर्मचाऱ्यांसह सुरु राहतील. याठिकाणी काउंटरवर तीन फुटाचे अंतर राखण्यासाठी जमिनीवर खुणा करणे आवश्यक आहे. तसेच कार्यालय परिसरात योग्य स्वच्छता असावी आणि हात धुण्याचे तसेच हात निर्जंतुकीकरण करण्याची सोय उपलब्ध असल्याबाबत खात्री करावी.
अत्यावश्यक वस्तू व सेवा पुरविणाऱ्या खालील दुकाने आणि आस्थापने यांना वरील निर्बंधातून सूट देण्यात आली आहे.
१. बॅंका, एटीएम, विमा, फिन्टेकसेवा, वित्तीय संस्था व अन्य संबंधित कार्य.
२. मुद्रित आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमे
३. माहिती तंत्रज्ञान आणि माहिती तंत्रज्ञान सक्षमित सेवा.
४. अत्यावश्यक वस्तूंची पुरवठा साखळी आणि वाहतूक
५. अन्न पदार्थ, औषधे आणि वैद्यकीय उपकरणे यांसह आत्यावश्यक वस्तूंचे ई-कॉमर्सद्वारे वितरण
६. अन्न पदार्थ, किराणा, दूध, ब्रेड, फळे, भाजीपाला, अंडी, मांस, मासे यांची विक्री, वाहतूक आणि साठवण
७. बेकरी आणि पाळीव प्राण्यांसाठीचे खाद्यपदार्थ आणि पशुवैद्यकीय सेवा आस्थापना
८. उपाहारगृहांमधून घरपोच सेवा, पार्सल
९. रूग्णालये, औषधालये आणि चष्म्याची दुकाने, औषधांचे कारखाने, विक्रेते आणि वाहतूक
१०. पेट्रोल पंप, एलपीजी गॅस, ऑईल एजन्सीज त्यांची साठवण आणि त्यांच्याशी संबंधित वाहतूक व्यवस्था
११. अत्यावश्यक सेवांकरिता खासगी संस्थांमार्फत पुरविल्या जाणाऱ्या सुरक्षासेवेसह अन्य सेवा देणाऱ्या संस्था
१२. अत्यावश्यक सेवांना किंवा कोविड १९ प्रतिबंधासाठी होणाऱ्या प्रयत्नांना मदत करणारी खासगी आस्थापने.
१३. वरील बाबींशी संबंधित पुरवठा साखळी
तंतोतंत निर्बंध हे मुलभूतपणे लोकांच्या हालचालीवर आहेत, परंतु वस्तू व पदार्थांच्या हालचालींवर आहेत.
राज्य शासनाचे विभाग आणि कार्यालये आणि सार्वजनिक उपक्रम हे फक्त अत्यावश्यक सेवा देण्यासाठीच कार्यरत राहतील. सर्व संप्रदायांची सर्व धार्मिक स्थळे मनाई आदेशान्वये बंद करण्यात आली आहेत. संचार बंदीच्या काळात अत्यावश्यक गरजेच्या वस्तूंच्या पुरवठ्याबाबत कोणताही अडथळा निर्माण होणार नाही, यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्यात यावी. सर्व खाजगी आणि शासकीय रूग्णालयातील वैकल्पिक शस्त्रक्रिया पुनर्नियोजित करण्यात याव्यात. जिल्हा पोलीस अधीक्षक, सर्व नगरपालिका व नगरपंचायतींचे मुख्याधिकारी व इतर सर्व सक्षम प्राधिकारी यांना, मानवीय व न्यायपूर्ण पद्धतीने वरील सर्व उपाययोजना व तरतूद यांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.