
नवी दिल्ली(वृत्तसंस्था)1 मे. देशभरातील वाढत्या कोरोना संक्रमितांच्या पार्श्वभूमिवर केंद्र सरकारे देशातील लॉकडाउनमध्ये दोन आठवड्यांची वाढ केली आहे. केंद्र सरकारने आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अंतर्गत हा लॉकडाउन 4 मेपासून पुढे दोन आठवडे म्हणजेच 17 मेपर्यंत वाढला आहे.
देशव्यापी लॉकडाउनचा आज ३८ वा दिवस आहे. देशभरातील विविध राज्यांमध्ये करोनाच्या रुग्णांची संख्या वाढताना दिसतेय.आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात करोना व्हायरसबाधित रुग्णांची संख्या ३५ हजार ०४३ वर पोहचलीय. तर करोनाला बळी पडणाऱ्यांची संख्या १,१४७ वर पोहचली.
करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर पहिल्यांदा लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनचा कालावधी १४ एप्रिल रोजी पूर्ण झाला होता. त्यानंतर त्यात ३ मे पर्यंत यात वाढ करण्यात आली होती. आता दोन पुन्हा एकदा दोन आठवड्यांसाठी लॉकडाउन वाढवण्याची घोषणा सरकारनं केली आहे. ४ मेपासून पुढील दोन आठवडे हा लॉकडाउन लागू असणार आहे. या काळात विमान आणि रेल्वे वाहतूक सुरू करण्यात येणार नसल्याचेही केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे. लॉकडाउनचा पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करत पुन्हा एकदा लॉकडाउनचा कालावधी ३ मे पर्यंत वाढवणार असल्याची घोषणा केली होती. परंतु आता केंद्रीय गृहमंत्रालयानं पत्रक काढून लॉकडाउनचा कालावधी वाढवल्याची घोषणा केली.
दरम्यान, हा लॉकडाउन लागू करताना सरकारनं ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये सशर्त काही सवलती देण्यात येतील. परंतु रेड झोनमध्ये कोणतीही सवलत देण्यात येणार नसल्याचं सरकारनं स्पष्ट केले आहे. रेड झोन, ऑरेंज झोन आणि ग्रीन झोन्ससाठी नव्या गृहमत्रालयाने काही नव्या गाईडलाइन्सही जारी केल्या आहेत. ग्रीन झोन्समध्ये करोनाचा एकही रुग्ण नाही किंवा २१ दिवसांमध्ये करोनाचा एक नवा रुग्ण सापडला नाही, अशा भागांचा समावेश करण्यात आला आहे. तसंच ज्या जिल्ह्यांचा समावेश रेड किंवा ग्रीन झोनमध्ये नसेल ते जिल्हे ऑरेंज झोनमध्ये सामिल करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.





