34.4 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home महाराष्ट्र मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री यांचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना जयंती निमित्त अभिवादन

मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री यांचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना जयंती निमित्त अभिवादन

0
113

blank

मुंबई, दि. 1:-  महाराष्ट्र सुजलाम-सुफलाम घडवायचा आहे. त्याच दिशेने पावले टाकत आपण शेतकऱी स्वावलंबी व्हावा यासाठी तसेच कृषी क्षेत्राच्या विकासाचे धोरण राबवित आहोत, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हरित क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना जयंती निमित्त अभिवादन केले आहे. या निमित्ताने मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी कृषी दिनाच्या तसेच कृषी विभागातर्फे 1 ते 7 जुलै दरम्यान आयोजित कृषी संजीवनी सप्ताहाच्या शुभेच्छाही दिल्या आहेत.

अभिवादन संदेशात मुख्यमंत्री म्हणतात, महाराष्ट्राला अन्न-धान्याच्या उत्पादनात स्वयंपुर्ण करण्याचा वसंतराव नाईक यांचा निर्धार होता, आणि तो त्यांनी कुशलतेने पूर्ण केला. ते हाडाचे शेतकरी आणि कृषीतज्ज्ञ होते. त्यांनी शेती आणि सिंचन क्षेत्राच्या आपल्या अभ्यासाचा राज्याच्या धोरणात प्रभावीपणे उपयोग केला. यातूनच सिंचन क्षेत्र वाढले आणि शेती उत्पादनात महाराष्ट्र स्वयंपूर्ण ठरला. त्याअर्थाने ते महाराष्ट्राच्या हरितक्रांतीचे प्रणेते आहेत. कृषीमंत्री, महसूलमंत्री आणि मुख्यमंत्री म्हणून वसंतराव नाईक यांनी महाराष्ट्राच्या जडणघडणीत आपला असा ठसा उमटवला आहे. त्यांनी महाराष्ट्राला समृद्ध आणि वैभवशाली करण्याची पेरणी केली आहे. त्याच दिशेने पावले टाकत आपण शेतकऱी स्वावलंबी व्हावा यासाठी तसेच कृषी क्षेत्राच्या विकासाचे धोरण राबवित आहोत. यातून महाराष्ट्राला सुजलाम-सुफलाम करण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहू या. हेच वसंतराव नाईक यांना आजच्या कृषी दिनी विनम्र अभिवादन.

माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून मंत्रालयात अभिवादन

मुंबई दि.1 :- हरित क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार आणि वनमंत्री संजय राठोड यांनी आज मंत्रालयात माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी मुख्य सचिव संजयकुमार, सामान्य प्रशासन विभागाच्या सचिव अंशू सिन्हा आदींसह मंत्रालयीन अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करुन अभिवादन केले.

उपमुख्यमंत्री अजित पवार  यांनी स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त तसेच आजच्या कृषी दिनानिमित्त राज्यातील शेतकऱ्यांना, जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. उपमुख्यमंत्री आपल्या शुभेच्छा संदेशात म्हणतात की, ‘कृषीक्रांती’ घडवून महाराष्ट्राला अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्णतेकडे नेणारे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक साहेब त्यांच्या दूरदृष्टी व कर्तृत्वामुळे सदैव स्मरणात राहती. त्यांचे विचार, कार्य अनेक पिढ्यांना प्रेरणा देतील. स्वर्गीय नाईक साहेबांनी त्यावेळची मर्यादित साधने आणि प्रतिकूल परिस्थितीचा सामना करुन राज्यात कृषीक्रांती घडवून आणली.

उपमुख्यमंत्री पुढे म्हणतात, स्वर्गीय वसंतराव नाईक हे हाडाचे शेतकरी होते. ‘शेती आणि शेतकरी’ हे त्यांच्या जिव्हाळ्याचे, अभ्यासाचे विषय राहिले. शेतीला आधुनिक स्वरुप देण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. राज्यात ‘कृषी विद्यापीठां’ची स्थापना केली. शेतकऱ्यांना संकरीत बियाणे उपलब्ध करुन अन्न-धान्याच्या दुष्काळावर मात केली. 1972 च्या दुष्काळाचं संकट त्यांनी आव्हान म्हणून स्वीकारलं आणि दुष्काळनिवारणाचा शाश्वत मार्ग दाखवला. राज्याच्या कृषीविकासाला योग्य दिशा दिली. ‘रोजगार हमी योजने’तून महाराष्ट्राच्या विकासाचा पाया मजबूत केला. ‘संकटाच्या काळात शासकीय मदतीचे धोरण लवचिक असले पाहिजे’ हा विचार त्यांनीच दिला. त्यांचा जन्मदिवस ‘कृषी दिन’ म्हणून साजरा करत असताना नाईक साहेबांनी दाखवलेल्या ‘कृषी विकासा’च्या वाटेवरच राज्य सरकार वाटचाल करत असून, शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे, असा विश्वासही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला दिला आहे.

स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त विधान भवनात अभिवादन

 मुंबई, दि. 1:- महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि राज्यातील हरित-धवल क्रांतीचे प्रणेते स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त आज बुधवार, दि. 1 जुलै, 2020 रोजी विधान भवन, मुंबई येथे त्यांच्या प्रतिमेस महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.याप्रसंगी वनमंत्री संजय राठोड, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे सचिव राजेन्द्र भागवत, अवर सचिव.रविंद्र जगदाळे, विधानपरिषद सभापतींचे सचिव महेंद्र काज आदी अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही स्व.नाईक यांच्या प्रतिमेस गुलाबपुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

blank