
गोंदिया,दि.06ः-सेवा निवृत्त कर्मचाछयाच्या एनपीएस खात्यातील रक्कम त्याच्या बँक खात्यात वळती करण्यासाठी तक्रारदाराकडून ५ हजार रुपयांची लाच मागणारा जिल्हा परिषदेतील लेखा विभागातील वरिष्ठ सहा. आकाश गौतम गवई हा रंगेहाथ पकडला गेला. ही कारवाई आज (ता.६) जिल्हा परिषदेत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने पार पाडली.सविस्तर असे की, तक्रारदार हे सेवानिवृत्त ग्रामसेवक असून त्यांनी एप्रिल २०२० मध्ये जिल्हा परिषदेच्या वित्त विभागातील वरिष्ठ सहा. आकाश गवई यांना भेटून त्यांची एनपीएस खात्यातील उर्वरित थकीत रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची मागणी केली. परंतु वरिष्ठ सहा. गवई याने ती रक्कम बँक खात्यात जमा करण्यासाठी व इतर कागदपत्रासाठी ५ हजार रुपयांची लाच मागितली. परंतु पैसे देऊन काम करण्याची मुळीच इच्छा नसल्याने तक्रारदाराने ३ जुलै रोजी लाच लुचपत विभागाकडे तक्रार नोंदविली. तक्रारीची ४ जुलै रोजी पडताळणी करण्यात आली.(ता.६) जिल्हा परिषदेच्या वित्त विभागात सापडा रचण्यात आला. दरम्यान आरोपी आकाश गवई याला पंचासमक्ष ५ हजार रुपयाची लाच स्वीकारतांना रंगेहात पकडण्यात आले. या प्रकरणी गोंदिया ग्रामीण पोलिस ठाण्यात आरोपी वरिष्ठ सहा. (लेखा) आकाश गवई विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला. ही कारवाई लाचलुचपत विभागाचे पोलिस अधीक्षक रश्मी नांदेडकर, अप्पर पोलिस अधीक्षक राजेश दुद्दलवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक रमाकांत कोकोट, स.फौ. शिवशंकर तुमडे, पो.हवा. राजेश शेंद्रे, नापोसि. नितीन रहंगडाले, राजेंद्र बिसेन, देवानंद मारबते
आदींनी पार पडली.





