
भंडारा, दि. 7 : – केंद्र शासनाने सुक्ष्म व मध्यम उद्योग मंत्रालयाअंतर्गत पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत ग्रामिण भागात 2020-21 या आर्थिक वर्षात 25 लाख प्रकल्प मर्यादेपर्यंत उद्योग उभारण्यासाठी जिल्हयातील बेरोजगार तरुण उद्योजकांनी अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या योजनेंतर्गत ग्रामिण व शहरी भागातील तरुणवर्गाला व पारंपारिक कारागिरांना एकत्रित करुन स्थानिक पातळीवर स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करुन देणे व खेडयापाडयातून शहराकडे येणाऱ्या बेरोजगारांचे व पारंपारिक कारागिराचे स्थलांतर थांबविणे, ग्रामीण भागात रोजगार वाढीस मदत करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
या योजनेंतर्गत उत्पादन प्रक्रिया उद्योगासाठी जास्तीत जास्त 25 लाख व व्यवसाय व सेवा उद्योगासाठी 10 लाखांची मर्यादा आहे. ग्रामिण भागासाठी प्रकल्प किंमतीच्या 25 व 35 टक्के रक्कम मार्जिन मनी (अनुदानस्वरुपात ) देण्यात येते. उत्पादन प्रक्रिया असलेल्या प्रकल्पामध्ये प्रकल्प किंमत 10 लाखापेक्षा जास्त असल्यास तसेच सेवा उद्योगासाठी प्रकल्प किंमत 5 लाख असल्यास किमान शैक्षणिक पात्रता आठवी उतीर्ण असणे आवश्यक आहे. अर्जदाराचे किमान वय 18 वर्ष पूर्ण असणे आवश्यक असून अर्जदाराने केंद्र राज्य शासनाच्या कोणत्याही योजनेमध्ये अनुदानाचा लाभ घेतलेला नसावा. केवळ नवीन उद्योजक, कारागीर संस्था व बचत गट या योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहे. या योजनेत अर्ज ऑनलाईन स्विकारले जात असून www.kviconline.gov.in या संकेतस्थळावर अर्ज व योजनेची संपूर्ण माहिती उपलब्ध आहे. या योजनेचा अर्ज तसेच अधिक माहितीसाठी कार्यालयीन वेळेत जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, जांभुळकर निवास, बाबा मस्तानशहा वार्ड, भंडारा दुरध्वनी क्र. 07184-252521 वर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी सि.बी. देविपुत्र यांनी केले आहे.




