वाशिम, दि. ०७ (जिमाका) : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्यावतीने १३ ते १५ जुलै २०२० या कालावधीत तीन दिवसीय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. याद्वारे जिल्ह्यातील उद्योजकांनी, आस्थापना प्रमुखांना त्यांच्याकडील रिक्त पदानुसार आवश्यक मनुष्यबळाची निवड करण्याची उपलब्ध करून देण्यात आली आहे. तरी जिल्ह्यातील उद्योजक, आस्थापनाधारक यांनी आपल्याकडे रिक्त असलेल्या जागांनुसार आवश्यक मनुष्यबळाची मागणी नोंदवावी व या ऑनलाईन रोजगार मेळाव्यात सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त सुनंदा बजाज यांनी केले आहे.
कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे आपल्या जिल्ह्यातून कुशल, अकुशल कामगारांचे स्थलांतर झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील उद्योग, आस्थापनामध्ये रिक्त पदांवर मनुष्यबळाची आवश्यकता आहे. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्यावतीने आयोजित ऑनलाईन रोजगार मेळाव्याद्वारे उद्योजक, आस्थापनाधारकांना आपल्याला हवे असलेले कुशल, अकुशल मनुष्यबळ निवडण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. तरी उद्योजक, आस्थापनाधारकांनी आपल्याकडे हवे असलेल्या कुशल, अकुशल मनुष्यबळाची माहिती https://rojgar.mahaswayam.gov.in या वेब पोर्टलवर नोंदविणे आवश्यक आहे. ज्या आस्थापनांना वेब पोर्टलवर रिक्तपदे नोंदविता येणार नाही, त्यांनी [email protected] या ई-मेलवर आपली मागणी आपल्या मोबाईल क्रमांकासह नोंदवावी अथवा कार्यालयाच्या ०७२५२-२३१४९४ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन श्रीमती बजाज यांनी केले आहे.



