
कोरची,दि.12ः नक्षलवादी असल्याचे सांगून कुर्हाडीचा धाक दाखवून प्रवाशांना लुटणार्या तिघांना कोरची पोलिसांनी अटक केली आहे. वसनलाल धुलाराम मडावी रा. कोटरा, दप्यारे झाडुराम हलामी व श्रीराम दामेसाय मडावी दोन्ही रा. सोनपूर, ता.कोरची अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
उपरोक्त तिघे व आणि काही जण कोरची तालुक्यातील वेगवेगळ्या मार्गावर रात्री उभे राहून ट्रकचालक व इतर वाहनधारकांना अडवून आणि नक्षली असल्याचे सांगून कुर्हाडीच्या धाकाने पैसे वसूल करीत होते.
या टोळीने बेळगाव घाटात बस व ट्रक अडवून नागरिकांकडून पैसे लुटण्यात आले. नाडेकल फाट्यावरही काही प्रवाशांकडून त्यांनी जबरीने वसुली केली. दोन-तीन दिवसांपूर्वी आरोपींनी बोटेकसा रस्त्यावर एक ट्रक अडवून चालकाकडून तसेच अन्य नागरिकांकडून पैसे लुटण्याचा प्रयत्न केला. त्यातील तिघांपैकी दोन जण फरार झाले. मात्र, ट्रकचालक व काही नागरिकांनी एका अनोळखी इसमास पकडून कोरची पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यानंतर अन्य दोघांनाही अटक करण्यात आली. पोलिसांनी त्यांच्याकडून पाचशे रुपये रोख, एक मोटारसायकल व एक मोबाईल असा एकूण २५ हजार ५00 रुपयांचा ऐवज जप्त केला. पोलिस उपनिरीक्षक महेश कोंडुभैरी व नितेश पोटे घटनेचा तपास करीत आहेत.





