
भंडारा दि.13 ; जिल्ह्यात आज दुसऱ्या कोरोनाबधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली असून 4 व्यक्तीचे अहवाल आज कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या 87 आहे. आज कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या मध्ये भंडारा तालुक्यातील 04 व्यक्तींचा समावेश आहे. आतापर्यंत 87 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. जिल्ह्यात आता कोरोनाबधितांची संख्या 174 झाली असून 85 क्रियाशील रुग्ण आहेत. कोरोना पॉझिटिव्ह मृतांची संख्या 02 झाली आहे.
भंडारा तालुक्यातील 33 वर्षीय (पुरुष) व्यक्तीला ताप, खोकला व सर्दीसाठी 10 जुलै रोजी भंडारा येथील एका खासगी दवाखान्यात भरती करण्यात आले होते. तेथून त्याच दिवशी त्या व्यक्तीला जिल्हा रुग्णालयातील आयसोलेशन वार्ड मध्ये भरती करण्यात आले. प्रकृतीत सुधारणा न झाल्यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर येथे संदर्भित करण्यात आले होते. त्याचा अहवाल 13 जुलै रोजी पॉझिटिव्ह प्राप्त झाला. सदर रुग्णाचा मृत्यू हा 13 जुलैला जीएमसी नागपूर येथे झाला असून मृत्यूचे कारण कोविड-१९ पॉझिटिव्ह, न्यूमोनिया व तीव्र स्वासदाह असल्याचे आरोग्य विभागाच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.सदर व्यक्ती हा वृत्तपत्र विक्रीचा व्यवसाय करीत असल्याचे बोलले जात आहे.
आतापर्यंत 5440 व्यक्तींच्या घशातील स्त्रावाचे नमुने नागपूर येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे. त्यापैकी आतापर्यंत 174 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह तर 4950 व्यक्तींचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. 316 नमुन्यांचा अहवाल प्राप्त व्हायचा आहे.
आज 13 जुलै रोजी आयसोलेशन वार्ड मध्ये 93 व्यक्ती भरती असून आतापर्यंत 530 व्यक्तींना आयसोलेशन वार्ड मधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर कोविड केअर सेंटर साकोली, तुमसर,लाखांदूर, पवनी, लाखनी, भंडारा व मोहाडी येथे 485 भरती आहेत. 4283 व्यक्तींना रुग्णालय क्वारंटाईन मधून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
पुणे, मुंबई व इतर राज्यातून 44926 व्यक्ती भंडारा जिल्ह्यात आले असून 42784 व्यक्तींचा 28 दिवसांचा होम क्वारंटाईन कालावधी पूर्ण झाला आहे. तसेच अन्य ठिकाणाहून आलेल्या 2142 व्यक्तींना होम क्वारंटाईन करण्यात आले असून त्यांनी घरामध्येच रहावे, घराबाहेर पडू नये अशा सक्त सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.




