
नागपूर,दि.१६ः वन विभागात व विशेष करून व्याघ्र प्रकल्पात वन्यजीवांची पुरेशी काळजी घेणे व त्यांना वेळेवर योग्य उपचार उपलब्ध करून देण्यासाठी ६ पशु वैद्यकीय अधिकारी (गट-अ) यांची नव्याने पदे भरण्यासाठी सेवा प्रवेश नियमांना मंजुरी देण्यात आल्याची माहिती वनमंत्री संजय राठोड यांनी दिली. तसेच वन्यजीव उपचार केंद्र नागपूरची पाहणी करीत उत्कृष्ट काम करणारे अधिकारी व कर्मचारी यांचा गौरव केला.
व्याघ्र प्रकल्प क्षेत्र तसेच लगतच्या इतर क्षेत्रात वन्य प्राण्यांबाबत विविध अपघात व आजारपण अशा घटना घडत असतात. त्यासाठी तातडीने उपचार करण्यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळ वन विभाग अंतर्गत उपलब्ध असावे म्हणून ६ पशु वैद्यकीय अधिकारी (गट-अ) ची नव्याने पदे भरण्यासाठी सेवा प्रवेश नियमांना मंजुरी देण्यात आली आहे. या बाबत नियमाधीन प्रक्रिया पूर्ण केल्या नंतर भरती प्रक्रियेला सुरुवात होईल अशी माहिती वनमंत्री संजय राठोड यांनी दिली. राज्यात ६ राष्ट्रीय उद्याने असून व ४९ अभयारण्य आहेत. तसेच राज्यात ६ व्याघ्र प्रकल्प असून राज्यात ३१२ एवढे वाघ आहेत. वाघ व इतर वन्यजीव यांचे आजारपण व अपघात या वेळी प्रशिक्षित पशु वैद्यकीय अधिकारी वेळेवर उपलब्धता होत नसल्याने प्राण्यांना जीवास मुकावे लागत असे. तसेच वन्यप्राणी मृत्यू पावल्यास अशा प्रकरणात सुद्धा तातडीने कार्यवाही करण्यास विलंब होत असे. त्या मुळे वन विभागात प्रशिक्षित पशु वैद्यकीय अधिकारी उपलब्ध व्हावे हि मागणी अनेक दिवसापासून वन्यजीव प्राणी अभ्यासक व वन विभाग क्षेत्रीय अधिकारी यांची होती. या निर्णयाने राज्यात पशुवैद्यकीय अधिकारी उपलब्ध होणार असल्याने हि समस्या काही अंशी सुटणार आहेत. राज्यात गोरेवाडा , संजय गांधी राष्ट्रीय उद्यान व माणिकडोह जुन्नर येथे वन्यप्राणी बचाव केंद्र वन विभाग मार्फत चालवण्यात येतात. त्या शिवाय चंद्रपूर, वडाळी , नवेगावबांध, सेमिनरी हिल्स नागपूर येथे तात्पुरते वन्य प्राणी उपचार केंद्र कार्यरत आहे. या निर्णयामुळे या केंद्रांना प्रशिक्षित पशु वैद्यकीय अधिकारी यांचे मार्गदर्शन, सल्ला व मदत उपलब्ध होणार आहे. तसेच सहायक आयुक्त पशुसंवर्धन(वन्यजीव )व उप आयुक्त पशु संवर्धन(वन्यजीव) ह्या पदांचे सेवा प्रवेश अंतिम करण्याचे काम अंतिम टप्यात असल्याचे वन मंत्री यांनी सांगितले .





