
कुरखेडा,ता.२२: नजीकच्या कुंभीटोला येथील एका शेतकऱ्याने कर्जाला कंटाळून आत्महत्या केली. ही घटना सोमवारी(ता.२०) रात्री आठ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. गिरीधर गोपाळा मुंगमोडे (५४ )असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
गिरीधर मुंगमोडे यांच्या शेतात धानाची रोवणी सुरु होती. सोमवारी दीप अमावस्येच्या दिवशी रोवणी आटोपल्यानंतर हुंडेकरी महिला व पुरुष घरी निघून गेले. त्यानंतर गिरीधर मुंगमोडे हे एकटेच शेतात एकटाच विहिरीजवळ ठेवलेल्या सामानाची सावरासावर करीत राहिले. दरम्यान, रात्रीचे आठ वाजले तरी वडील घरी न परतल्याने मुलगा प्रमोद याने शेजारी लोकांसह आपले शेत गाठले. त्यावेळी शेतातील पाणी नसलेल्या विहिरीत गिरीधर मुंगमोडे यांचा मृतदेह आढळून आला.
विशेष म्हणजे ३६ फूट खोल असलेली विहीर कोरडी आहे. या विहिरीत बोअर असून त्यालाही पाहिजे त्या प्रमाणात पाणी नाही. त्यामुळे मुंगमोडे यांनी दुसऱ्या शेतकऱ्याकडून पाणी घेऊन कशीबशी धानाची रोवणी आटोपली होती. मागच्या वर्षी त्यांचे पीक कर्ज माफ झाले होते. परंतु त्यांच्यावर चालू वर्षीचे पुनर्गठित् पीक कर्ज होते. शिवाय गावातील बचत गटाकडूनही त्यांनी कर्ज घेतले होते. त्यामुळे ते तणावात असायचे. त्यामुळेच त्यांनी आत्महत्या केली असावी, असा कयास आहे.





