
अमरावती,दि.२४: मद्यधुंद अवस्थेतील मुलाने वडीलांची निघृणपणे हत्या केल्याची घटना फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या पोहरा गावात बुधवारी रात्री घडली. याप्रकरणी पोलीसांनी मारेकरी पुत्रास ताब्यात घेतले आहे.
राजू पाचबुद्ध (४०, पोहराबंदी) असे वडीलांची हत्या करणाऱ्या युवकाचे तर मारोतराव पाचबुद्ध नाव आहे. राजू पाचबुद्ध यास दारूचे व्यसन असून त्याची पत्नी व मुले एक वर्षापूर्वी त्याला सोडून निघुन गेले आहेत. आरोपी हा एकटाच त्याच्या घराच्या शेजारी राहत आहे. बुधवारी (ता.२२) रात्री तो मद्यधुंद अवस्थेत घरी पोहोचला. त्याने त्याचे वडील मारोतराव व आई यांच्याशी वाद घातला. त्यांने आईला अश्लील शिवीगाळ केली. आपली पत्नी व मुले यांना आणून कां देत नाही असा प्रश्न त्याने केला. यावेळी त्याने वडीलांसोबत भांडण करून त्यांचे डोके, मांडी व दोन्ही हातावर टोकदार हत्याराने वार केले. यात त्याचे वडील गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यु झाला. याप्रकरणी फ्रेजरपुरा पोलीसांनी राजू पाचबुद्ध याच्याविरूद्ध हत्येचा गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे.





