सेक्युरा हॉस्पिटल येथे डेडीकेटड कोविड रुग्णालय ३० बेडची सशुल्क सुविधा; १० बेड व्हेंटिलेटर सुविधेसह

0
85

वाशिम, दि. ०४  : कोविड १९ च्या अनुषंगाने निर्गमित मार्गदर्शक सूचनांच्या अधीन राहून सेक्युरा हॉस्पिटल येथे डेडीकेटेड कोविड रुग्णालय सुरु करण्यास मान्यता देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी आज, ४ ऑगस्ट रोजी याबाबतचे आदेश निर्गमित केले आहेत. त्यामुळे कोरोना विषयक चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तींना निरीक्षणाखाली ठेवण्यासाठी ३० बेडची सशुल्क सुविधा उपलब्ध झाली आहे. यापैकी १० बेड व्हेंटिलेटर सुविधेसह असणार आहेत.

‘आयसीएमआर’ने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे तसेच महाराष्ट्र शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशांचे व मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी करणे, उपचारासाठी लागणाऱ्या तज्ज्ञ डॉक्टर, कर्मचारी, अधिकारी वर्ग चोवीस तास नियमितपणे उपस्थित ठेवणे, रुग्णालयात निरीक्षणाखाली ठेवण्यात आलेल्या व्यक्तींची माहिती गोपनीय ठेवणे, तसेच रुग्णालयामध्ये पुरेशा प्रमाणात प्रयोगशाळा तंत्रज्ञ (लॅब टेक्निशियन), रुग्णवाहिका असणे बंधनकारक राहणार आहे.

ज्या व्यक्ती निरीक्षणाखाली ठेवण्यात येतील त्या वैद्यकीय कक्षात यासंदर्भात काम करणारे हॉस्पिटलचे मनुष्यबळ व शासकीय अधिकारी, कर्मचारी यांच्याशिवाय इतर कोणालाही प्रवेश राहणार नाही. तसेच याठिकाणी आलेल्या व गेलेल्या प्रत्येक व्यक्तींच्या आवश्यक नोंदणी ठेवणे बंधनकारक राहील. तसेच सदर क्षेत्र हे फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ नुसार प्रतिबंधात्मक क्षेत्र घोषित करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी श्री. मोडक यांनी निर्गमित केलेल्या आदेशात म्हटले आहे.

महेश भवन येथे सशुल्क विलगीकरण केंद्र

कोरोना विषयक चाचणीसाठी घशातील स्त्राव नमुने घेतल्यानंतर त्याविषयीचा अहवाल प्राप्त होण्यासाठी किमान २४ तासांचा कालावधी लागतो. या काळात विलगीकरणाची अतिरिक्त सुविधा निर्माण व्हावी, यासाठी वाशिम येथील महेश भवन हे काही अटी व शर्तींच्या अधीन राहून खासगी संस्थात्मक विलगीकरण केंद्र म्हणून यापूर्वीच अधिसूचित करण्यात आले आहे. महेश भवन या खासगी संस्थात्मक विलगीकरण केंद्रात स्वतंत्र शौचालय, स्नानगृह असलेल्या २० खोल्यांची सुविधा उपलब्ध आहे. घशातील स्त्राव नमुने घेवून अहवाल प्राप्त होईपर्यंत याठिकाणी व्यक्तींना राहता येईल.