
गडचिरोली,दि.16 : जिल्ह्यातील भामरागडच्या पर्लकोटा नदीच्या पुराचे पाणी गावात शिरल्याने हाहाकार उडाला आहे. पुलावरून पाणी वाहात असल्याने छत्तीसगड सीमेकडील भामरागड तालुक्यातील जवळपास 70 गावांचा संपर्क तुटला आहे.दरम्यान आपत्ती व्यवस्थापन विभागाचे पथक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याच्या कामाला लागल्याची माहिजी जिल्हाधिकारी यांनी दिली आहे. पर्लकोटा नदीचे विस्तीर्ण पात्र शनिवारी पूर्णपणे भरले. सायंकाळी सहा वाजताच्या दरम्यान नदीचे पाणी पुलावर चढणे सुरू झाल्याने वाहतूक पूर्णपणे बंद होऊन अनेक गावांचा दळणवळण संपर्क तुटला आहे. काही दुकानांमधून पाणी शिरले. त्यांनी कालपासूनच सामान हलविणे सुरू केले होते.पुलावरील पाण्यातून पैलतीर गाठण्याचा प्रयत्न कोणी करू नये म्हणून महसूल आणि नगर पंचायत प्रशासनाने दोन्ही तीरावर कर्मचाऱ्यांना तैनात केले. याशिवाय आपत्ती व्यवस्थापन यंत्रणाही तयार आहे. पूर परिस्थितीत वीज पुरवठा आणि मोबाईल संपर्क सुरू राहावा यासाठी प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. तहसीलदार सत्यनारायण सिलमवार, नायब तहसीलदार प्रकाश उप्पुलवार, अनमोल कांबळे, नगर पंचायत मुख्याधिकारी सुरज यादव परिस्थितीवर नजर ठेवून आहेत.





