
नवी दिल्ली,दि.22 – दिल्लीतील धौला कुआं रिंग रोड परिसरात चकमक सुरू आहे. यामध्ये ISIS च्या एका दहशतवाद्याला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. स्पेशल सेल टीम ही मोठी कारवाई करत आहे. गुप्तचर यंत्रणेकडून यासंदर्भात माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस यंत्रणा सतर्क होती आणि त्यांनी सर्च ऑपरेशन सुरू केलं. मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीमध्ये चकमक सुरू झाली असून ISISचा एका दहशतवाद्याला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अब्दुल युसूफ असं या दहशतवाद्याचं नाव आहे. दहशतवाद्याकडून मोठ्या प्रमाणात IED स्फोटकांचा साठा जप्त करण्यात आला आहे. दिल्ली पोलिस स्पेशल सेलचे डीसीपी प्रमोदसिंग कुशवाह यांनी दिलेल्या माहितीनुसार, धौला कुआंमध्ये दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने केलेल्या कारवाईनंतर ISIS च्या एका दहशतवाद्याला अटक करण्यात आली आहे. आणखी काही दहशतवाद्यांना अटक करण्यात येऊ शकते. दिल्ली पोलिसांनी दहशतवाद्यांचा मोठा कट उधळून लावला आहे. IED स्फोटकांचा साठा जप्त केला आहे. अब्दुल युसूफ या दहशतवाद्याकडून दोन IED स्फोटकं जप्त करण्यात आली आहेत. त्याच्यासोबत आणखी एक साथीदार असल्याची माहिती मिळत आहे. मात्र चकमकीदरम्यान तो फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.





