सिरोंचा,दि.25ःशहरातील वार्ड क्रमांक ९ मधील एका दुकानावर धाड टाकून सुगंधित तंबाखू व खर्रा घोटण्याची मशीन असा एकूण २0 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दुकानदारावर सिरोंचा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रामू अंकलू दुरशेट्टी असे आरोपीचे नाव आहे.
तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करून सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यामुळे कोरोना विषाणूचा प्रसार होतो. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांनी तंबाखू विक्री बंदी व पानठेले उघडण्यावर निबर्ंध लावले आहे. मात्र, शहरातील काही दुकानदार किराणा व इतर साहित्यांच्या आड सुगंधित तंबाखू, तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करतात. सिरोंचा शहर किराणा असोसिएशनने तंबाखू विक्री न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची अंमलबजावणी देखील केली जात आहे. मात्र, शहरातील काही मुजोर विक्रेते शासनाच्या व असोसिएशनच्या निर्णयाची पायमल्ली करीत तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करीतच आहेत.
शहरातील वॉर्ड क्रमाक ९ मध्ये महिनाभरापूर्वी नव्याने एक दुकान सुरू झाला आहे. त्या दुकानांतुन सुगंधित तंबाखूची विक्री होत असून रात्रीच्या सुमारास माल आला असल्याची माहिती मिळताच पोलीस विभाग व मुक्तीपथने संयुक्त कारवाई करीत त्या दुकानाची झडती घेतली. यावेळी त्या दुकानातून सुगंधित तंबाखूचे १५ मोठे डब्बे व खर्रा घोटण्याची मशीन असा एकूण २0 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी संबंधित दुकानदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील दुकानदारांनी तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करू नये, असे आवाहन पोलीस विभाग व मुक्तीपथ अभियानाद्वारे करण्यात आले आहे. सदर कारवाई पोलीस निरीक्षक अजय अहिरकर यांच्या मार्गदर्शनाखाली बिट जमादार तोरे व मुक्तीपथ तालुका चमूने केली.