
तिरोडा : तालुक्यातील बिर्सी फाटा येथील नागपुरे यांच्या घरी चोरी करुन चोरट्यांनी रोख रक्कमेसह लाखो रुपयांचे दागिने चोरुन नेले होते. या घटनेतील तीन आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. बिर्सी येथील नागपुरे कुटूंबातील सदस्य काही महिन्यापूर्वी कोरोना संसगार्मुळे सरांडी येथील विलगीकरण केंद्रात होते. या कालावधीत त्यांचे घर कुलूपबंद होते. हीच संधी साधून चोरट्यांनी त्यांच्या घरातील रोख रक्कमेसह सोन्याचांदीचे दागिने चोरुन नेले होते. याप्रकरणी पोलिसात तक्रार करण्यात आली होती. सुमार पाच लाख रुपयांची चोरी झाल्याचे नमूद झाले असले तरी हा आकडा २0 लाखांच्या जवळपास असल्याचे बोलले जाते. विशेष म्हणजे, त्यांचे घर कंटेनमेंट झोनमध्ये असताना तसेच पोलिस पहारा असतना चोरी झाली होती. सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरांचे छायाचित्र आल्यानंतरही तपासात शिथीलता आहे, असे पोलिसांवर आरोप केले जात होते. परंतु सहायक पोलिस निरीक्षक सचिन ढोके यांनी या चोरीचा अखेर २१ ऑक्टोबर रोजी उलगडा केला. भुपेंद्र तिर्थराज पटले (३१ रा.छोटा गोंदिया), सचिन गोपीचंद कावळे (२३ रा.विर्सी फाटा) व पुंडलीक बंसोड (२२ रा.विर्सी फाटा) या तीनही चोरट्यांना सीसीटीव्ही फुटेज तसेच गुप्त माहितीवरुन अटक करण्यात आली आहे.