
कोल्हापूर–येथील बस डेपोतून प्रादेशिक परिवहन मंडळाच्या निरीक्षकांनी जप्त करून लावलेला ट्रक चोरी केल्या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जिल्हा उपाध्यक्ष बबल्या ऊर्फ अभिजीत भूपाल पवार याच्यासह महावीर रामचंद्र वडर यांना पोलिसांनी अटक केली आहे. आणखी एका अज्ञाताविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबतची फिर्याद श्रीमंत बाबू मुचंडी यांनी दिली आहे.
दरम्यान गुरुवारला पहाटे जिल्हा उपाध्यक्ष बबल्या ऊर्फ अभिजीत पवार याला पोलिसांनी सापळा रचून त्याच्या घरातून शिताफीने अटक केली आहे. त्याला न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. प्रादेशिक परिवहन मंडळाच्या निरीक्षकांनी ६ चाकी ट्रकवर कारवाई करून जप्त केला होता. त्यानंतर त्यांनी तो येथील एसटी डेपोच्या वर्कशॉपमध्ये लावला होता.
दरम्यान, बुधवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास वर्कशॉपमधील वॉचमन श्रीमंत बाबू मुचंडी यांच्याशी एकजण या ट्रकबाबत हुज्जत घालत होता. तर वर्कशॉपच्या भिंतीपलीकडे बबल्या पवार आणि अज्ञात एकजण बुलेट घेऊन थांबले होते. अज्ञाताने भितीवरून उडी मारून वर्कशॉप आवारात प्रवेश केला. त्यानंतर त्यांने तो ट्रक भरधाव वेगाने वर्कशॉपच्या बाहेर नेत चोरून नेला. तर तो अज्ञात आणि बबल्या पवारने तेथून पलायन केल्याचे फिर्यादित म्हटले आहे.