महिला वनपरिक्षेत्र अधिकार्‍याची आत्महत्या;स्वत:वर बंदुकीने झाडल्या गोळ्या

0
297

धारणी,दि.26: रेल्वे गाडीत बसून डिंक तस्कर पळून गेल्यावर दुचाकीद्वारे मध्यप्रदेशपर्यंत पाठलाग करत आरोपींना सळो की पळो करुन सोडणार्‍या आणि लेडी सिंघम म्हणून ओळखल्या जाणार्‍या वनपरिक्षेत्र अधिकारी दिपाली चव्हाण (वय 28 वर्ष) यांनी हरिसाल येथील शासकीय निवासस्थानी स्वत:वर गोळ्या झाडून आत्महत्या केली. ही घटना गुरूवार रात्री आठ वाजताच्या दरम्यान घडली. गेल्या महिन्यात पोलिस अधिकारीने गळफास घेऊन आत्महत्या केली होती.  मिळालेल्या माहितीनुसार, दीपाली चव्हाण आपल्या आईसोबत वनविभागाच्या शासकीय निवासात राहात होत्या. गुरुवारी (दि. २५ मार्च) सकाळी ११ वाजताच्या सुमारास चव्हाण यांनी आईला गाडी करून देऊन बाहेरगावी पाठवले. गावाला गेल्यानंतर आईने फोन केला असता त्यांनी मोबाईल उचलला नाही. म्हणून त्यांच्या आईने शेजारील गार्डशी संपर्क साधून घरी जाऊन पाहायला सांगितले.गार्डने घरी जाऊन पाहिले असता त्या घरात मृतावस्थेत पडलेल्या आढळल्या. त्यांच्या शेजारी पिस्तुल पडलेले होते. चव्हाण यांच्या आत्महत्येचे नेमके कारण स्पष्ट झालेले नसले तरी वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याची चर्चा आहे.

धारणी तालुक्यातील हरिसाल येथे व्याघ्र प्रकल्पाच्या शासकीय घरात दिपाली चव्हाणचा मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली. घटना उघड झाल्यानंतर तब्बल दीड तास कोणालाच घरात प्रवेश करु देण्यात न आल्याने उलट सुलट चर्चा सुरु होती. दिपाली यांनी त्यांच्याजवळ असलेल्या शासकीय बंदुकीतल्या गोळ्या स्वतःच्या छातीवर मारून घेतल्या, अशी माहिती आहे. त्या गर्भवती असल्याचीही माहिती समोर आली आहे. स्वभावाने हसमुख व आधुनिक विचारांच्या दिपाली आत्महत्या करुच शकत नाही, असा अंदाज परिचीतांनी वर्तविला आहे.

एका माहितीप्रमाणे, दिपालीला एक उच्चपदस्त वन अधिकारी नेहमी अपमानास्पद वागणूक देत होते. दोन-चार दिवसांपूर्वी ते अधिकारी येऊन गेले, त्यावेळी दिपालीला त्यांनी झापल्याची माहिती आहे. मृत्यूपूर्वी दिपाली यांनी सुसाईड नोट लिहून ठेवले आहे. त्यात काय लिहीले ते समजू शकलेले नाही. मृतकाच्या घरीच घटनेच्या वेळी कोणीच नव्हते, असे समजले आहे. दिपाली यांनी धुळघाट रेल्वे येथे असताना सालई डिंक तस्करांना नामोहरम केले होते. हरिसाल येथे रोरा, मांग्या व मालुर या तीन गावांच्या पुनर्वसनासाठी त्यांनी भरीव कामगिरी केली होती. सोमवारीच दिपाली यांनी प्रा. आ. केंद्रात कोरोना प्रतिबंधक लस घेतली होती. घटनेची माहिती मिळताच आमदार राजकुमार पटेल तथा उपविभागीय पोलिस अधिकारी संजय काळे पोचहलेले होते. पोलिस तपास सुरू आहे.