
ग्रामविकास अधिकारी रहागंडालेंच्या पत्नीची गोरेगाव पोलिसात तक्रार
गोंदिया,दि.29ः- एकीकडे आरएफओ दिपाली चव्हाण यांचे आत्हत्याप्रकरण शांत व्हायला असतानाच गोंदिया जिल्हा परिषदेंतर्गत येत असलेल्या गोरेगाव पंचायत समितीतंर्गत कुऱ्हाडी ग्रामपंचायतीचे ग्राम विकास अधिकारी यांचा विषारी औषध प्राशन केल्याने आज सोमवारला(दि.29)मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे.सविस्तर असे की,कुऱ्हाडी ग्रामपंचायतीचे सरपंच पतीसोबत कुठल्यातरी मुद्यावर वाद झाल्याने आणि ते असह्य झाल्याने ग्राम विकास अधिकारी यांनी दोन दिवसापुर्वी रात्रीला घरी घेऊन थिमेट नामक विषारी औषध प्राशन केले.विषारी औषध प्राशन करण्यापुर्वी त्यांनी एक चिट्टी लिहिली असून त्या चिट्ठीमध्ये कुऱ्हाडी ग्रामपंचायतीच्या सरंपाच पतीचा नावाचा उल्लेख असल्याचे बोलले जात आहे.विषारी औषध प्राशन केल्याचे घऱच्यांना कळताच त्यांनी लगेच रुग्णालयात हलविले.त्यानंतर गोंदियाच्या रुग्णालयातून नागपूर येथे उपचारासाठी हलवण्यात आले होते.मात्र आज उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.त्यांनी लिहून ठेवलेल्या पत्राच्या आधारे त्यांच्या पत्नीने पोलिसांत तक्रार देत सरपंच पतीवर कारवाईची मागणी केली आहे. शिवकुमार चैतराम रहांगडाले (रा. आदर्श कॉलनी, गोरेगाव) असे आत्महत्या प्रयत्न करणाऱ्या ग्राम विकास अधिकाऱ्याचे नाव आहे.विशेष म्हणजे सदर सरपंचाचे पती हे जिल्हा परिषदेत शासकीय नोकरीवर असल्याचे वृत्त आहे.
शिवकुमार रहांगडाले यांच्या पत्नी अंतकला शिवकुमार रहांगडाले (५०, रा. आदर्श कॉलनी, गोरेगाव) यांनी दिलेल्या लेखी तक्रारीनुसार, शिवकुमार रहांगडाले हे मागील ४ वर्षांपासून ग्राम कुऱ्हाडी येथे ग्राम विकास अधिकारी पदावर कार्यरत आहेत. बुधवारी (दि. २४) त्यांनी दोनदा उलटी केल्याने त्यांना गोंदिया गायत्री हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. यावर डॉक्टरांनी अंतकला यांना त्यांनी विष प्राशन केल्याचे सांगितले. शिवकुमार यांची प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी शुक्रवारी (दि.२६) अंतकला यांना उपचाराच्या दृष्टीने शिवकुमार यांनी कोणते विष प्राशन केले ते बघण्यास सांगितले. यावर त्यांनी घरी जाऊन शिवकुमार यांची बॅग बघितली असता त्यात त्यांना शिवकुमार यांनी लिहिलेले पत्र मिळून आले. त्यात शिवकुमार यांनी मागील १ वर्षापासून सरपंचांचे पती मार्तंड पारधी ग्रामपंचायतच्या कामात हस्तक्षेप करीत असल्याचे लिहिले आहे. चुकीचे बिल देऊन पैसे काढण्यासाठी प्रवृत्त करीत असून तसे न केल्यास वरिष्ठांकडे खोट्या तक्रारी करून खोटी कामे करण्यासाठी दबाव आणतात. त्यांच्या त्रासाला कंटाळून मानसिक संतुलन बिघडल्याने आत्महत्या करीत असल्याचे पत्रात नमूद आहे.
या पत्राच्या आधारे श्रीमती अंतकला रहागंडाले यांनी ग्रामसेवक संघटनेच्या सोबत जाऊन शनिवारी (दि. २७) गोरेगाव पोलिसांत तक्रार देत शिवकुमार यांना आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या पारधी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती.त्यावेळी गोरेगाव ठाणेदारांनी मृत्यू न झाल्याने 306 चा गुन्हा दाखल होणार नसल्याचे सांगत आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याप्रकरणी तक्रार दाखल करुन घेतली होती. त्यानुसार आज सोमवारला चिठ्ठीत नाव असलेल्या व्यक्तीला अटक करुन न्यायालयात हजर करण्यात आले.न्यायालयाकडे पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली असता न्यायालयाने पोलीस कोठडी न देता जामीन दिला.मात्र आत्ता प्रकरणातील व्यक्तीचा मृत्यू झाल्याने 306 चा गुन्हा दाखल करण्यात आला असून उद्या मंगळवारला न्यायालयात जामीन रद्द करण्यासाठी नव्याने अर्ज सादर करण्यात येणार असल्याचे सांगत मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आल्याची माहिती गोरेगाव पोलीस निरिक्षक सचिन मेहतरे यांनी दिली.