
तिरोडा,दि.31 : तालुक्यातील भुराटोला येथील शेतशिवारात तणसच्या 4 ते 5 ढिगांना आग लागली. पाहता-पाहता संपूर्ण ढीग आगीत भस्मसात झाले. त्यामुळे शेतकर्यांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले असून असून आता जनावरांसाठी चारा कुठून मिळणार, अशी समस्या या शेतकर्यांसमोर उभी ठाकली आहे. ही घटना आज बुधवार, 31 मार्च रोजी दुपारी 12 वाजताच्या सुमारास घडली.
शहरापासून 4 किमी अंतरावर तिरोडा-खैरलांजी मार्गावर भुराटोला हे गाव आहे. या गावाच्या दक्षिण दिशेला लेंडीबांध नावाने प्रसिद्ध असलेला तलाव आहे. तलावाच्या पूर्व दिशेला, तलावाला लागूनच शेतकऱ्यांची शेतजमीन आहे. या शेतामध्ये शेतकरी धान्य पिकवितात आणि त्यातून निघणारी तणस जनावरांचे पोट भरण्यासाठी अन्न म्हणून वापरतात. मात्र जनावरांच्या या अन्नाला काही दुष्ट लोकांची नजर लागली. अज्ञात व्यक्तीने ढिगाला आग लावली. त्यामुळे त्या आगीच्या विळख्यात त्या परिसरातील चार ते पाच ढीग संपूर्ण जळून नष्ट झाले आहे.
जनावरांना चारण्यासाठी आता चारा कुठून आणावा? हा प्रश्न उभा झालेला आहे. आग कोणी लावली, हे अजून स्पष्ट झाले नाही. मात्र ज्या व्यक्तीने आग लावली असेल त्याला कोणता फायदा झाल असेल, ते त्यालाच माहीत. कदाचित व्ययक्तिक आकसापोटी सुद्धा अशा घटना घडवून आणल्या जातात.
सध्या मोहफुले वेचून जमा करण्याचा हंगाम सुरू होत आहे. तर एखाद्या व्यक्तीने मोहाची पाने जाळण्याकरिता तर आग लावली नसावी, असा संशय संतप्त शेतकरी व्यक्त करीत आहेत.