मंडल अधिकारी प्रशांत बैसला लाच घेताना अटक

0
58

भद्रावती-चंदनखेडा साजात मंडल अधिकारी म्हणून कार्यरत प्रशांत बैस याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने एक हजार पाचशे रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. या घटनेने महसूल विभागात चांगलीच खळबळ माजली आहे.
चंद्रपूर येथील रहिवासी शेतकरी तक्रारदाराने चंदनखेडा साजातील मौजा जरूर घारापुरे येथील सर्व्हे नंबर ११९/२ मधील १.६२ हेक्टर आर जमिनीचे फेरफार करण्याकरिता चार महिन्यापूर्वी प्रकरण दाखल केले होते फेरफार घेण्याकरिता बैस यांनी अर्जदारास दोन हजार रुपयांची लाच मागितली तर तोडीअंती दीड हजार रुपये देण्याचे ठरले. यांची माहिती तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दिली त्यानुसार दिनांक १ एप्रिलला दुपारी तीन वाजता तक्रारकर्त्याकडून पंधराशे रुपयाची लाच स्वीकारताना प्रशांत बैस याला तहसील कार्यालयात लाच लुचपत पथकाने रंगेहात पकडले. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक अविनाश भामरे, पोलिस हवालदार मनोहर ऐकोनकर, संतोष येलपुलवार, अजय बागेसर, रोशन चांदेकर, रवी ढेगळे, समीक्षा भोंगळे, सतीश सीडाम या चमूने केली. विशेष म्हणजे दिनांक ३१ मार्चला बापूराव ऐकरे यांनी आपल्या शेतीचा फेरफार संदर्भात याच मंडल अधिकारी तसेच तलाठी विनोद डोंगरे यांच्या विरोधात तहसीलदार महेश शितोळे यांच्याकडे आठ हजार रुपये मागितल्याची लेखी तक्रार केली होती, हे विशेष.