
गोंदिया, दि.8 : गोंदिया रेल्वे अंतर्गत अवैधरित्या ई-तिकीट बनवून विक्री करणार्या गोंदिया ग्रामीणमधील रहिवासी 32 वर्षीय आरोपीला रेल्वे सुरक्षा दलाच्या क्राइम ब्रांचने अटक केली. त्याच्या जवळून 11 हजार 532 रुपयांच्या 16 ई-तिकीट जप्त करण्यात आल्या.
सध्या कोरोना परिस्थितीमुळे रेल्वे तिकिटांची मोठी किल्लत निर्माण झाली आहे. अशात रेल्वेच्या अवैध तिकिटा बनवून विक्री करणारे दलाल सक्रिय झाले आहेत. असाच रेल्वेने प्रवास करणार्या प्रवाशांच्या तिकिटा अवैधरित्या बनवून अधिक नफा कमविण्याचे कार्य करणारा गोंदिया ग्रामीणमधील रहिवासी 32 वर्षीय आरोपीची गोपनीय माहिती रेल्वे सुरक्षा दलाच्या क्राइम ब्रांचचे निरीक्षक अनिल पाटील यांना मिळाली. त्यांनी खात्री करून ते सोबत उपनिरीक्षक के.के. दुबे, मुख्य आरक्षक आर.सी. कटरे, आरक्षक एस.बी. मेश्राम यांच्या सोबत घटनास्थळी धाड घातली.
आरोपीने आपल्या पर्सनल आयडीने रेल्वेच्या 16 आरक्षित तिकिटा तयार केल्या होत्या. त्यांची किंमत 11 हजार 532 रुपये सांगण्यात आली. ते सर्व जप्त करून आरोपीविरुद्ध रेल्वे अधींनियमच्या कलम 143 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील कारवाईसाठी आरोपीला रेल्वे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.