भंडारा- बपेरा शिवारात ३१ मार्च रोजी बावनथडी प्रकल्पाच्या लघु कालव्यामध्ये मृतावस्थेत आढळलेल्या वाघाच्या मृत्यू प्रकरणात वनविभागाद्वारे सुरु असलेल्या तपासात गावातील दोन आरोपींना रात्री उशिरा अटक करण्यात आली. पोलीस दलाकडील श्वानपथकाची मदत घेऊन २ एप्रिल २0२२ रोजी सकाळ पासूनच परिसराची पुन्हा एकदा तपासणी करण्यात विभागाद्वारे करण्यात आली होती.
सहाय्यक वनसंरक्षक,प्रकष्ठ निष्कासन अधिकारी, गडेगाव साकेत शेंडे यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या तपासात घटनास्थळ परिसरात आढळून आलेल्या पुराव्यांच्या आधारे स्थानिक पाच संशयितांची वन विभागाद्वारे कसून चौकशी करण्यात आली. आरोपी तुळशीराम दशरथ लिल्हारे याच्या शेतात काही वन्यप्राण्यांचे हाडे, कवठी, करंट लावण्यासाठी वापरण्यात येणार्या खुंट्या आणि इतर साहित्य वनविभागाचे अधिकार्यांनी जप्त केले होते. आरोपीच्या शेतात वाघाच्या पायाचे ठसे आढळून आले होते. सदर प्रकरणांमध्ये तपासाअंती आरोपी तुळशीराम दशरथ लिल्हारे व त्याचा मुलगा शशिकांत तुळशीराम लिल्हारे या दोघांना वन विभागाने २ एप्रिल २0२२ रोजी रात्री उशिरा अटक केली.
आरोपींनी अवैधरित्या विद्युत प्रवाहाचा वापर करून वाघाची शिकार केली व बैलबंडी द्वारे वाघास शेता जवळच्या कालव्यात आणून टाकले असल्याचे तपासात समोर आले आहे. दोन्ही आरोपींना न्याय दंडाधिकारी प्रथम श्रेणी न्यायालय तुमसर, येथे आज ३ एप्रिल रोजी हजर करण्यात आले. प्रथम श्रेणी न्यायालयाने सदरचा वन गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा असल्याचे निरीक्षण नोंदविले आहे व आरोपींना पाच दिवसांची वन कोठडी मंजूर केली आहे.
भंडारा जिल्ह्यात चालू वर्षात अवैधरित्या करंट लावून वाघांची शिकार करण्याची ही दुसरी घटना घडलेली असून ही बाब अत्यंत चिंताजनक आहे. जिल्ह्यातील वाघांचे अस्तित्व राखायचे असल्यास शेतकर्यांनी करंट लावण्याचा अघोरी प्रकार बंद करणे अत्यंत आवश्यक आहे.
वाघ हा जंगलातील अन्नसाखळीचा सर्वोच्च घटक असून परिस्थितीकीय संतुलन राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावतो. त्यामुळे ज्या जंगलात वाघांचा वावर आहे, अशी जंगले समृद्ध समजली जातात. भारतीय वन्यजीव अधिनियम १९७२ नुसार वाघ हा अनुसूची १ मध्ये समाविष्ट वन्य प्राणी असून त्यास कायद्याद्वारे सर्वोच्च संरक्षण दिलेले आहे. वाघाची शिकार करणार्या आरोपीस तीन ते सात वर्ष कारावासाच्या शिक्षेचे प्रावधान आहे.
बपेरा येथील वाघाचे शिकार प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा होईल याकरिता वन विभाग सर्वतोपरी प्रयत्न करेल. जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांना करंट लावून वन्य प्राण्यांची शिकार करण्याचा अघोरी प्रकार थांबवण्याचे वनविभाग याद्वारे आव्हान करीत आहे.