
गडचिरोली : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चामोर्शी मार्गावरील मुख्य पाईपलाईनमध्ये एका तरुणाचा मृतदेह मिळाल्याने खळबळ उडाली आहे. शुक्रवारी दुपारी २ च्या सुमारास ही घटना उघडकीस आली. पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनमध्ये मृतदेह गेला कसा, असा सवाल शहरवासीयांकडून उपस्थित केला जात आहे. मृतदेहाची ओळख पटली नसून गडचिरोली शहर पोलिसांकडून तपास सुरू आहे.पाण्याचा प्रवाह कमी झाल्याने पाईपलाईनचे व्हॉल्व उघडून बघितले असता पाईपलाईनमध्ये मृतदेह अडकल्याचे दिसले. मृतदेह व्हॉल्वमधून काढता येत नसल्याने जेसीबीने मोठा खड्डा खोदून पाईपलाईन मोकळी करण्यात आली. त्यानंतर मृतदेह बाहेर काढण्यात आला. हा मृतदेह पाण्याच्या टाकीतून प्रवाहाद्वारे चामोर्शी मार्गावर वाहत आला असावा, असा अंदाज आहे. मृतदेहाची ओळख पटली नसून मृताचे वय अंदाजे ३० असावे, अशी माहिती गडचिरोलीचे पोलीस निरीक्षक शकतलाम यांनी दिली.