नक्षल्यांनी केली तेंदुपत्ता फडी मुंशीची हत्या

0
50

गडचिरोली,दि.२३ जून– पोलिस खबरी असल्याच्या संशयावरून नक्षल्यांनी काल रात्री भामरागड तालुक्यातील मलमपोडूर येथील एका तेंदुपत्ता फडी मुंशीची तीक्ष्ण शस्त्राने हत्या केली.लच्छुराम ऊर्फ लकीकुमार ओक्सा (३८) असे मृत फडी मुंशीचे नाव असून तो बिनागुंडा जवळच्या भुसेवाडा येथील मूळ रहिवासी होता.

लकीकुमार ओक्सा हा भामरागड तालुक्यातील मलमपोडूर येथे तेंदूपत्ता फळीवर मुंशी म्हणून काम पाहत होता. बुधवारी रात्री १० वाजताच्या सुमारास सशस्त्र नक्षलवादी मलमपोडूर येथे गेले. त्यांनी लकीकुमारला झोपेतून उठवून गावाबाहेर नेले आणि नंतर तीक्ष्ण शस्त्राने त्याची हत्या केली व गावाबाहेर त्याचा मृतदेह फेकून दिला. सकाळी प्रातर्विधीसाठी जाणाऱ्या काही लोकांना त्याचा मृतदेह आढळून आला. याची माहिती पोलिसांना देण्यात आली. उल्लेखनीय आहे की लच्छूराम ऊर्फ लकीकुमार हा जिल्ह्यात छोटीमोठी ठेकेदारी करायचा. त्याचे संपूर्ण जिल्हाभर विविध राजकीय, प्रशासकीय आणि ईतर व्यक्ती संस्थाशी संबंध होते. काही दिवसांपूर्वी त्याचा एक्सीडेंट झाला होता. त्यानंतर तो मलमपोडूर येथे फडीमुंशी म्हणून काम करत होता. या घटनेमुळे परिसरात दहशत निर्माण झाली आहे.