
नागपूर–एका प्रेमी युगुलाने हिंगणा परिसरातील गुमगाव रेल्वेस्थानकापासून एक किमी अंतरावर धावत्या रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी सकाळी आठ वाजता उघडकीस आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ वर्षीय तरुण आणि २२ वर्षे वयोगटातील तरुणी हे दोघेही गुमगाव रेल्वेस्थानकापासून एक किमी अंतरावर रेल्वे रुळावर उभे होते.
या दरम्यान दुरंतो एक्स्प्रेस येत होती. ‘लोको पायलट’ने जोरजोरात हॉर्न वाजवला. परंतु, दोघेही रुळावरून बाजूला झाले नाही. क्षणार्धात दोघांनाही भरधाव रेल्वेने धडक दिली. या धडकेत दोघांनाही जवळपास ५०० मीटरपर्यंत फरफटत नेले. दोघांच्याही शरीराचे अनेक तुकडे झाले.
माहिती मिळताच हिंगण्याचे ठाणेदार विशाल काळे हे पथकासह घटनास्थळावर पोहचले. त्यांनी दोघांचेही मृतदेह मेडिकलमध्ये शवविच्छेदनासाठी पाठवले. याप्रकरणी तूर्तास आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न सुरू केले.